काळधर्म निवारणारी भरणे ची श्री काळकाई देवी

देवेंद्र जाधव | खेड : कोकण श्रध्दाळू लोकांचा प्रांत मानला जातो. याचे प्रत्यंत्तर देणारे मुंबई-गोवामहामार्गावरील भरणे येथील ‘श्री देवी काळकाई’ चे मंदिर. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून श्रध्देने श्री देवी।काळकाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या खऱ्या अर्थाने मनोकामनाच पूर्ण होऊन मानसिक आधारही मिळतो. काळधर्म निवारणारी श्री देवी काळकाई भक्तगणांच्या गळ्यातील ताईत बनली असून महामार्गावरून येणारे-जाणारे नेहमीच देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढच्या मार्गाला जात नाहीत.

तमाम भक्तांचे श्रद्धास्थान, भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी व माहेरवाशिणींची पाठराखीण असलेल्या आदिमाया श्री देवी काळकाईच्या नवरात्रोत्सवास २६ सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे. मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत पहिले गाव भरणे लागते. महामार्गावरील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व श्री देवी काळकाईचे
मंदिर भाविकांच्या चटकन नजरेस पडते. श्री देवी काळकाई नवसाला पावते, अशी भावना जिल्ह्यातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भक्तगणांची बनली आहे. नवरात्रोत्सवात मुंबई, पुणे, ठाणे तसेच घाटमाथ्यावरून अनेक भाविकांची
पावले श्री देवी काळकाई मंदिराकडे वळतातच. दूरवरच्या कोसावरूनही भाविक नवस करण्यासाठी येथे आवर्जून हजेरी लावतात. याठिकाणी सर्वजण एकात्मतेच्या भावनेतून।नांदत असून नवसाला पावणाऱ्या श्री देवी काळकाईला एकदा तरी भेट द्यावी, असे प्रत्येकालाच मनोमनी वाटत असते. यामुळेच नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची एकच झुंबड उडत असते.

नवरात्रोत्सवात असंख्य माहेरवाशिणी आदिमाता श्री देवी काळकाईच्या नवसाची परतफेड करण्यासाठी, हातभेटीचा नारळ देण्यासाठी व खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी तसेच तिच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून येत असतात. सुमारे दीडशे वर्षापूर्वी याठिकाणच्या घनदाट जंगलात अनेक गुराखी आपली गुरे चारण्यासाठी घेऊन येत असत. या गुरांच्या कळपात एक गाय होती. ती गाय एका विशिष्ट ठिकाणी सायंकाळी एका दगडावर दूध देत असे. हा प्रकार तेथील गुराख्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने गावातील इतर जाणत्यांना याबाबतची कल्पना दिली. एका दगडावर दूधाची धार सोडून ती गाय पुन्हा वासराला दूध देण्यासाठी मालकाकडे जायची. ज्या ठिकाणी गाय दूध द्यायची त्या पाषाणाची ग्रामस्थांनी पाहणी केली असता दैवी वास्तव असल्याचा दृढ विश्वास ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला. या निष्कर्षातूनच पाषाणाच्या ठिकाणी मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली. हा विचार सुरू असतानाच एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दिलेल्या दृष्टांतात एका रात्रीत निगडीच्या लाकडाचे मंदिर उभारण्याची सूचना केली व त्या ग्रामस्थांने
देवीचे मंदिरही उभारले, अशी या भरणे येथील श्री देवी
काळकाईची आख्यायिका सांगितली जाते.

काळधर्म निवारण करणारी देवी म्हणून या देवीचे नाव श्री देवी काळकाई असल्याचे जाणकार सांगतात. पुराणातील कथांमध्ये खेडजाई, रेडजाई, पाथरजाई, वरदायिनी व काळकाई या ५ बहिणी होत्या, असा उल्लेख आहे. त्यानुसार शहरासह ग्रामीण भागात या देवीची मंदिरे असून भरणे येथे श्री देवी काळकाईचे मंदिर आहे. दिडशे वर्षापूर्वीचे छोटे असलेले हे मंदिर भक्तांनी हळूहळू सुसज्ज बनवले. १७ ऑक्टोबर २००१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या जीर्णोद्धारासाठी मंदिर कार्यकारिणी देखील स्थापन करून संस्थाही नोंदणी करण्यात आली. यावेळीच मंदिराच्या पुनर्जीर्णोद्धारासाठी साऱ्यांनीच कंबर कसली. जीर्णोद्धारासाठी लागणारी रक्कम देखील भक्तांनीच गोळा केली. अवघ्या २ वर्षातच मंदिराला आधुनिकतेचा साज चढला. एप्रिल २०१० मध्ये मंदिरावर सुवर्ण कलशारोहण देखील करण्यात आले. या कलशारोहण सोहळ्यात सहभागी झालेले हजारो भाविक श्री देवी काळकाईबद्दलच्या श्रद्धेची साक्षच पटवते.

श्री देवी काळकाई मंदिराकडे जाण्यासाठी खासगी वाहने तसेच महामार्गावरून धावणाऱ्या एस.टी.बसने जाता येते. भरणेनाका येथे रिक्षाने उतरून देखील मंदिराकडे पायी चालत जाता येते. आदिमाता श्री देवी काळकाईसमोर गाऱ्हाणे घातल्यावर त्यांची पूर्तता करणे, वाईट गोष्टींचे निर्मूलन, दुष्ट प्रवृत्तीचा व असत्याचा नाश करणे, सत्याची कास धरत न्याय करणे आदी महत्त्वपूर्ण भूमिका आदिमाया श्री देवी काळकाई निभावत असून ईश्वरी शक्तीच्या जोरावर भक्तगणांचे रक्षण करून भाविकांना न्याय देत असल्यामुळेच हजारो भाविक श्री देवी काळकाईच्या चरणी नतमस्तक होऊन शुभाशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून येतात.