ह्या महिन्यात आंबा- काजू चालू पिक विमा उतरण्याबाबत बागायतदारांमध्ये नाराजी
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — बागायतदारांनी वेळेत रक्कम भरून विमा कंपन्यांकडे हवामानावर आधारित आंबा- काजू पिक- विमा नियमित उतरला आहे. मात्र गेली दोन-तीन वर्षे हवामानाच्या प्रतिकूल अन लहरीपणामुळे, बागायतदारांचे अतोनात नुकसान होत आहे. हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसात पिक विम्याची नुकसान भरपाई बागायतदारांच्या खात्यावर जमा होणे, आवश्यक आहे. विमा कंपन्या अंतिम तारीख जाहीर करून विमा रक्कम वेळेत भरून घेते ,मात्र नुकसान झाल्यानंतर हवामान नोंदणी केंद्रावरील चुकीच्या नोंदी, शासनाचा सहभाग इत्यादी कारणे सांगून नुकसान भरपाई बागायतदारांच्या खात्यावर जमा करण्यास विलंब करीत आहे. ८० टक्के नुकसान झाल्यास, ५० टक्के रक्कम नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये जमा होते.
चालू २२-२३ मधील आंबा-काजू पिक- विमा पोटी नुकसान झालेली रक्कम ऑक्टोबर २३ संपला, ६ महिने उलटून गेले तरी, उशीर होऊनही अद्याप जमा झालेली नाही. त्यातच नोव्हेंबर २३ अखेर, पुढील २३-२४ चा पिक- विमा भरण्यासाठी तालुका- जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी, सोसायटी- कृषी सहाय्यक मार्फत बागायतदारांना आग्रह करणे सुरू केले आहे. वेळेवर फळ पिक- विमा भरूनही अन् नैसर्गिक नुकसान होऊन सुद्धा सहा- सहा महिने हंगाम संपल्यानंतर नुकसान भरपाई मिळणार नसेल ? तर फळ- पिक विमा कशासाठी उतरायचा ? असा संतप्त सवाल फळ पिक विमा धारकांकडून विचारला जात आहे. याकडे स्थानिक आमदार व विरोधी नेते यांचे प्रयत्न सुद्धा कुचकामी ठरलेले दिसून येत आहे.त्यामुळे विश्वास कुणावर ठेवायचा? अशा संभ्रमावस्थेत बागायतदार आहेत. किंबहुना हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा- काजू पिक विमाधारकांची झालेली १०० टक्के नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी न मिळाल्यास, बागायतदार चालू वर्षाचा फळ पिक- विमा न उतरण्याच्या मानसिकतेखाली दिसत आहेत .
त्यामुळे शासन अन विमा कंपन्यांच्या ओढाताणीत आणि शासनाचा विमा कंपन्यावर कोणताही अंकुश नसल्याने फळ विमाधारकांना गेली अनेक वर्षे वेळेवर नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत.यामध्ये स्थानिक नेत्यांनी गांभीर्याने लक्ष घालून तातडीने शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यास विमा कंपन्यांना भाग पाडावे, अशी आग्रही अपेक्षा बागायतदारांकडून व्यक्त होत आहे..











