मुलाच्या समोरच विहिरीत बुडून वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

कातवड येथील घटना : विहिरीतील पंप जोडणी सुरु असताना घडली घटना

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर फोवकांडा पिंपळ येथील रहिवाशी गणेश मारूती आचरेकर हे आपल्या कातवड वस्ती शाळा समोर येथील आंबा बागेतील विहिरीतील पाईप दुरूस्त करत असताना तोल जावून विहिरीच्या पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

वडिल बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता मुलगा सिन्मय विहिरीत उतरला आरडा ओरडा केला असता अन्य ग्रामस्थ त्याठिकाणी दाखल झाले व मदतकार्य केले. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आचरेकर यांच्या बागेत गर्दी केली होती.

घटनेची माहिती पोलीस पोटील भिकाजी परब यांनी पोलीसात माहिती दिली आहे. पोलीसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व हेड कॉस्टेबल सुशांत पवार हे करीत आहेत.

आचरेकर यांची आंबा बाग कातवड याठिकाणी आहे. या बागेला काही दिवसांपुर्वी आग लागल्याने आंबा बागेतील झाडांना पाणी पुरवठा करणारे पाईप जळाले होते. यामुळे सोमवारी सकाळी बागेतील जळालेले पाईप बाजूला करून विहिरीतील पाईपही दुरूस्त करण्यासाठी आचरेकर आणि मुलगा चिन्मय बागेत गेले होते. याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. यापुर्वीही आचरेकर यांच्या बागेला आग लागल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता पुन्हा आंबा बाग उभी राहत असताना पुन्हा एकदा आग लागल्याने आंबा कलमांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक यतीन खोत यांनीही धाव घेत ग्रामस्थासोबत मदतकार्यात सहभागी झाले.