पक्षाने टाकलेला विश्वास सार्थकी लावणार
जिल्हयात रोजगार आणून युवकांना करणार सक्षम
सावंतवाडी । प्रतिनिधी : माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपाने मोठी जबाबदारी देऊन माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल केंद्रातील राज्यातील व जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्याचे मी आभार मानतो. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याबरोबरच नरेंद्र मोदी यांचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी लवकरच राज्याचा दौरा करणार असून जास्तीत जास्त युवा वर्ग भाजपकडे कसा वळेल यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत, अशी माहीती भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष
अजय गोंदावळे, तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, जितेंद्र गावकर आदी उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना सोयी सुविधा सर्वसामान्यांसाठी आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार तळागाळात नेण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. हे काम करत असताना जिल्ह्यातील माझे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली व सर्वच नेतेमंडळीचे मार्गदर्शन आणि सहकार्य घेणार आहे, असे ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टीची युवा फळी मजबूत करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्या माध्यमातून लवकरच राज्यभर दौरा करून जास्तीत जास्त युवा वर्ग भाजपकडे कसा वळेल यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. एकूणच ज्या हेतूने माझ्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पार्टीचा तो हेतू साध्य करत माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.राज्यात युवा वर्ग व्यसनाधीनतेकडे वळत चालला आहे ही शोकांतिका आहे. मात्र, या युवा वर्गाच्या दोन हाताला काम देऊन त्यांना सक्षम करून स्वतःच्या पायावर उभे करत व्यसनाधीनतेपासून रोखण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्याकरता भविष्यात जिल्ह्यात रोजगार आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे, असेही विशाल परब यांनी सांगितले.











