मिरवणे येथील मेघना गुढेकर यांनी परिश्रमातून फुलवला रंगीबेरंगी झेंडू

अष्टविनायक स्वयंसहाय्यता समूहातील महिलांची स्वतंत्र व्यवसायाची निर्मिती

संतोष कुळे l चिपळूण :उमेद अभियान अंतर्गत महिलांना स्वयंसहायता समूहमार्फत आर्थिक सक्षम करण्यासाठी शासनाने राबवलेली बचतगटाची चळवळ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. चूल आणि मूल या संकल्पनेतून महिला बाहेर पडून आता आपल्या सामूहिक विचारांची देवाण-घेवाण करत बचत गटातून प्रगतीच्या दिशेकडे जात आहेत. असाच एक चिपळूण तालुक्यातील अष्टविनायक स्वयंसहायता समूह मिरवणे यांनी सुद्धा धाडसी पाऊल उचलत या गटातील मेघना मंगेश गुढेकर यांनी शेतीला पूरक जोडधंदा करत कुक्कुटपालनासह यावर्षी वीस गुंठे क्षेत्रात झेंडूची लागवड करून रंगीबिरंगी फुलवला आहे.

चिपळूण तालुक्यातील मिरवणे गावामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान उमेद अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,चिपळूण अंतर्गत अष्टविनायक स्वयंसहाय्यता समुह स्थापन करण्यात आला. या समुहामध्ये एकूण ११ सदस्य कार्यरत आहेत. या समुहाला उमेद अभियानाकडून फिरता निधी(RF) १५ हजार व बँक अर्थसहाय्य(BL) बँक ऑफ इंडिया शाखा-रामपूर मधून १ लाख ५० हजार रुपये आणि समुदाय गुंतवणूक निधी(CIF) ६० हजार मिळाले आहेत.

या गटातील प्रत्येक महिलेने स्वतंत्र उद्योग करून उपजीविकेचे साधन तयार केले आहे. याच समूहातील सौ.मेघना मंगेश गुढेकर यांनी शेतीला पूरक उद्योग म्हणून लेअर कुक्कुटपालनची जोड दिली. वैष्णवी विजय गुढेकर या कुक्कुटपालन व झेंडू लागवड करतात . साक्षी संजय गुढेकर किराणा व शिवणकाम, भाग्यश्री भरत गुढेकर किराणा व्यवसाय, गीता गणेश गुढेकर लेडीज गारमेंट, पूर्वा किरण गुढेकर चिकन शॉप, उज्वला दिलीप गुढेकर चिकन शॉप आणि कविता एकनाथ गुढेकर केक व्यवसाय टाकून या सर्व महिला आपला स्वतंत्र व्यवसाय करीत आहेत.

मिरवणेतील अष्टविनायक महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा असलेल्या मेघना यांनी गावातील ११ महिला गटातील सदस्यांना आर्थिक विकासाची दिशा दिली आहे. त्यामुळे हा समूह प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शिवण काम, प्रक्रिया उद्योग, भाजीपाला, झेंडू लागवडीतून गटातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.

नव नवीन प्रयोग हे सौ. मेघना गुढेकर ह्या करत असतात. यावेळेस त्यांनी झेंडूची २० गुंठे क्षेत्रामध्ये अष्टगंधा जातीची २५०० रोपांची मल्चींग पध्दतीने लागवड केली आहे. फुलांची गणपती, नवरात्र आणि दिवाळी मध्ये झेंडूच्या फुलांची मागणी लक्षात घेता त्यांनी हे धाडशी पाऊल उचलले. त्यांच्या परिश्रमाना यश आल्याने त्यांचे कौतुक होत आहे. झेंडू लागवडीसाठी लागणारे खत हे त्या स्वत: आपल्या कोंबड्याच्या माध्यमातून तयार करतात. आता २० गुंठ्याचा परिसर झेंडू फुलल्याने रंगीबेरंगी झाला आहे. यातूनच त्यांनी आर्थिक उत्पन्न तयार केले आहे. मेघना गुढेकर यांनी अष्टविनायक स्वयंसहायता समूहातून आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे.

कोकणामध्ये घरोघरी परसबागेत गावठी कोबंड्याचे संगोपन करणारी कुटुंब आहेत. त्यातील काही लोक गावठी कोंबडी, तसेच अंड्याची देखील विक्री करतात. परंतु व्यावसायिक तत्वावर अंडी विक्री करणारे कमी आहेत. अंड्याची दैनंदिन मागणी लक्षात घेऊन मिरवणे येथील मेघना आणि त्यांचे पती मंगेश गुढेकर यांनी एक वर्षापूर्वी कुक्कुटपालन करण्यास सुरवात केली.

बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य विक्रीतून स्वतंत्रपणे आर्थिक उत्पादन तयार केले आहे. प्रशिक्षणातून उद्योगाची पायाभरणी केली. मिरवणे येथील मेघना या समुदाय संसाधन व्यक्ती आहेत.अंडी गोळा करताना मेघना यांनी लेअर पद्धतीने संगोपन केले आहे. १० हजार पक्षी सध्या त्या संगोपन करत आहेत. व्यवस्थापन व विक्री साठी समुहातील सदस्यांची चांगली मदत होते. विक्रीचा दर हा सरासरी ४ रु. ते ५ रू. इतका मिळतो या व्यवसायामधून दर महिना २० ते २५ हजार रुपयांची उलाढाल केली. यासाठी त्यांना तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर आणि रामपूर प्रभाग समन्वयक सुहास माळी यांचे मार्गदर्शन लाभले.