एक तरी शाळा बंद केल्याचा पुरावा द्या : एक क्षणही पदावर राहणार नाही

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आव्हान

सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्यात शाळा बंद बार सुरू अशी टिका करणाऱ्यांनी एक जरी शाळा बंद केली असे पुराव्यासहित सिद्ध करा मी पदावर एक क्षण ही थांबणार नाही, असे आव्हान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. घरची संपत्ती विकून राजकारण करतो हे खोक्याचा आरोप करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे अन्यथा मी तोड उघडले तर काय होईल लक्षात ठेवा, असा इशाराही मंत्री केसरकर यांनी दिला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शुक्रवारी सावंतवाडी दौर्‍यावर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी उपस्थित होते.

शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांना फसविले म्हणणा ऱ्यांनी प्रथम अभ्यास करावा आणि नंतर कोणी कोणाला फसविले याचा शोध घ्यावा. मी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडताना शरद पवार यांना सांगितले होते. तर शिवसेनेतूनही बाहेर पडतना ताठ मानेने सर्वाना सांगून उघडपणे गेलो होतो आणि शिवसेना भाजपमध्ये पुन्हा युती व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणाराही मीच होतो, असेही ते म्हणाले.

शाळा बंद बार सुरू अशा टिका करणाऱ्यांनी मी शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार घेण्यापूर्वीच शिक्षणाची अवस्था बघितली पाहिजे होती. धनदांडग्यांनी मोठ्या संस्थात शिक्षण घ्यावे आणि सर्व सामान्य जनतेच्या मुलांनी कुठे जायचे त्याना चांगले शिक्षण मिळावे यासाठी वेगळे प्रयत्न केले तर बिघडले कुठे असा सवाल करीत माझी नाहक बदनामी थांबवा अन्यथा मला तोंड उघडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.