संपूर्ण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था दर्जेदार : दीपक केसरकर

‘गुरु सेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्या ‘त २५ शिक्षकांचा सन्मान ; दीपक केसरकर मित्रमंडळाचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था आणि शिक्षक अत्यंत दर्जेदार असे काम करत आहेत. राज्यातील शिक्षकांसाठी मी वेतनवाढ तसेच विनाअनुदानित शाळांना वाढीव अनुदान अशा सर्व सुविधा शिक्षकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आता लवकरच प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षक भरतीही केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षण विभागात जे जे निर्णय घेता येतील ते मी निर्णय घेणार आहे, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

दरम्यान, शिक्षक संघटना व शिक्षक सध्या आंदोलनात्मक भूमिका घेत आहेत. खरतर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्यरत राहायला हवे. मी शिक्षण मंत्री झाल्यापासून शिक्षकांच्या सर्व समस्या व अडचणी दूर करत आलो आहे. असे असताना जर शिक्षक कुठल्या आंदोलनात किंवा कुठलीही वेगळी भूमिका घेत असतील तर मी गप्प बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने ‘गुरु सेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा २०२३ ‘ चा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ प्राथमिक ,माध्यमिक आदर्श शिक्षकांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना संबंधित करताना मंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दीपक केसरकर मित्रमंडळाचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भरत गावडे, विठ्ठल कदम ,गजानन नाटेकर ,प्रतीक बांदेकर, गणेश प्रसाद गवस ,प्रा. रुपेश पाटील, आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या सुषमा मांजरेकर, म. ल . देसाई ,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के आदी उपस्थित होते .