सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळण्यासाठी आग्रही राहणार

खा. सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ता मेळाव्यात आश्वासन

दोडामार्ग कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

दोडामार्ग : प्रविण परब
कोकण व पवार कुटुंबियांचे पाच दशकापासूनचे ऋणानुबंध आहेत. ‘सेवा, सन्मान व स्वाभिमान’ हे ब्रिदवाक्य घेऊनच भविष्यात मार्गक्रमण करणार आहोत. इमानदारी ही आमची खरी ताकद आहे. त्यामुळे सत्तेत नसतानाही ईडी, सीबीआयची भीती बाळगली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. महाविकास आघाडीत आगामी विधानसभा निवडणूकीत सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळविण्यासाठी मी स्वतः पूर्ण ताकद लावणार, असा ठोस शब्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा दोडामार्ग तालुका कार्यकर्ता मेळावा महालक्ष्मी सभागृहात खा. सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, पक्ष निरीक्षक शेखर माने, व्हिक्टर डान्टस, प्रसाद रेगे, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, जिल्हा उपाध्यक्ष संदिप गवस, शहर अध्यक्ष सुदेश तुळसकर, महिला तालुकाध्यक्ष ममता नाईक, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, सावली पाटकर, तालुका सचिव गौरांग शेर्लेकर, रुपेश जाधव, विशाल जाधव, गोविंद महाले आदी उपस्थित होते.

खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, कोकणला माजी खा. मधु दंडवते, बॅ. नाथ पै यांच्या समृद्ध विचारांचा वारसा आहे. सिंधुदुर्गात रस्ते, पाणी, शिक्षण, रोजगाराच्या समस्या गंभीर आहेत. शिक्षणा सारख्या महत्वाच्या विषयावर हलकेफुलके निर्णय कसले घेता ? असे म्हणत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. हलू आवाजात बोलणार्‍यां पासून सावध रहा. ते कधी गद्दारी करतील ते सांगता येणार नाही असे सांगताना नाव न घेता दीपक केसरकरांवर निशाणा साधला.

प्रास्ताविकात अर्चना घारे परब म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस व कोकणचे दृढ स्नेहसंबंध राहिले आहेत. पवार साहेबांनी शंभर टक्के अनुदानावर फलोत्पादन योजना राबविल्यामुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. मनीऑर्डरवर अवलंबून राहण्याची पद्धत बंद झाली. निसर्गाने कोकणाला भरभरुन दिले आहे. आडाळी एमआयडीसी स्थापन होऊन १० वर्षे उलटली तरीही उद्योग आलेले नाहीत. आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर आहे. पाणीप्रश्न गंभीर आहे. जंगली प्राण्यांपासून होणारे शेती व बागायतीचे नुकसान व मिळणारी तुटपुंजी भरपाई हा विषयही गंभीर आहे. पर्यटनदृष्ट्या परिस्थिती असूनही सरकारच्या अनास्थेमुळे चालना मिळालेली नाही. महिला बचतगटांना वाव मिळालेला नाही. दशावतार व लोककलाकारांना मानधन वेळेत मिळत नाही. शेतीमालाला हमीभाव नाही. राष्ट्रवादीचे गतवैभव परत मिळविण्यासाठी सर्व कार्यकर्ते उत्सुक असल्याचे सांगितले.

अमित सामंत यांनी कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला पाहिजे अशी आग्रही मागणी केली. सुरेश दळवी यांनी अर्चना घारे परब यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करु अशी हमी दिली. यावेळी प्रविण भोसले, व्हिक्टर डान्टस, गोविंद महाले, संदिप गवस यांनी मार्गदर्शन केले.

या मेळाव्यासाठी दोडामार्ग तालुक्यासह जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक अर्चना घारे परब यांनी केले. सुत्रसंचलन संदिप गवस यांनी केले. यावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी विविध मागण्यांची निवेदने स्विकारली.तत्पूर्वी बांदा येथे खा. सुप्रिया सुळे यांचे अर्चना घारे परब यांनी ढोलताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत केले. कोकणच्या निसर्गसंपन्नतेचे त्यांनी कौतुक केले. यावेळी प्रशांत पांगम, समीर सातार्डेकर उपस्थित होते.