चिपळूणमध्ये स्त्यावर पडलेल्या खड्ड्याची मनसेकडून पूजा

चिपळूण : रस्त्याच्या मधोमध अंडरग्राऊंड गटार लाईनवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पूजा करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधत या गटार लाईनचे काम निकृष्ट झाल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी समोर आणले. बहादूरशेख नाका मच्छीमार्केटशेजारी स्वा. सावरकर लघु औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या गटार लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या लाईनवर मोठा खड्डा पडला आहे.

बहादूरशेख नाक्यावरून होणारी वाहतूक याच रस्त्यावरून वळविल्याने येथील खड्ड्यात वाहने अडकून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी शहराध्यक्ष प्रशांत सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खड्ड्याची पूजा करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. या वेळी चिपळूण उपशहराध्यक्ष गुरू पाटील, संदेश सुरूसे, राजेंद्र गोंजारे, विनोद चिपळूणकर, नीलेश जामसूतकर, ओंकार पिलवलकर,पंकज कुंभार, अमित सावर्डेकर, वेदांत चिपळूण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.