किल्ले ‘राजकोट’ला गतवैभव प्राप्त होणार

 

भाजप माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी व्यक्त केला विश्वास : उद्या होणारा गडकिल्ले माती कलश सोहळाही ठरणार लक्षवेधी

मालवण | प्रतिनिधी : मालवण किनारपट्टी येथे साजरा होणाऱ्या नौदल दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जात आहे. या ठिकाणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजप नेते नीलेश राणे यांच्या उपस्थितीत १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता ३४ गडकिल्ल्यांतील गोळा करण्यात आलेली माती एकत्रित करून शिवपुतळा उभारणीच्या ठिकाणी भुमीपूजन कार्यक्रम करण्यात येणार आहे. यासाठी ढोलताशांच्या गजरात भव्य ‘माती कलश’ रॅली शहरातून काढण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये राजकोट आणि मेढा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहे. राजकोट किल्ल्याचे गतवैभव यानिमित्ताने पुन्हा एकदा प्राप्त होणार असल्याने आमच्यासाठी तो एक भाग्याचा दिवस आहे. कलश मिरवणूक जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यांवर सडारांगोळी आणि आकर्षक विद्युत रोषणाई करून सजविण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक गणेश कुशे यांनी दिली.

कलश मिरवणुकीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कुशे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक जॉन नन्होना, नंदू देसाई, सहदेव बापर्डेकर, कैलास खांदारे, राजू गोडसे, हेमंत रामाडे, नागेश परब, योगेश कांबळे, अथर्व काळसेकर, नितीन केरकर, प्रविण काळसेकर, नवनीत लब्दे तसेच इतर उपस्थित होते..

राजकोट किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली होती. सन १७६६ मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे रहाण्यासाठी परवानगी मागितली होती. १८६२ मध्ये किल्ल्यात काही इमारतींचे अवशेष, तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे. तीन बाजूंनी पाणी (समुद्र) व एका बाजूला जमीन असलेल्या या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत. या बुरुजावरून सिंधुदुर्ग किल्ला व आजुबाजूचा परिसर दिसतो. त्यामुळे या गडकिल्ल्यात छत्रपतींचा पुतळा बसणार असल्याने या परिसरातील पर्यटन विकासाला संधी मिळणार आहे. शिवपुतळा उभारण्याचे काम नौदलाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शिवपुतळा परिसरात तटबंदी उभारण्यात येत असल्याने सध्या राजकोट परिसराला ऐतिहासिक महत्व प्राप्त होत आहे. किल्ल्याच्या तटबंदीची निर्मिती पूर्ण होत आहे. यामुळे रॉकगार्डन, जयगणेश मंदिर याचबरोबर आता राजकोटमध्ये छत्रपतींचा शिवपुतळा उभारण्यात येत असल्याने राजकोटमध्ये पर्यटनातून विकासाची दारे उघडणार आहेत. पंतप्रधान स्वतः येत असल्याने सिंधुदुर्ग वासियांसाठी आणि खास करून मालवणसाठीही खास भेट विकासनिधीच्या रूपाने मिळणार असल्याचा विश्वास श्री. कुशे यांनी व्यक्त केला आहे.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या कलश मिरणुकीच्या निमित्ताने मेढा व राजकोट वासियांच्यावतीने चव्हाण व राणे यांचा सत्कार होणार आहे. मिरवणुकीने भुमीपुजन सोहळा झाल्यानंतर त्याचठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मेढा आणि राजकोट परिसरातील विकासकामांसाठी आवश्यक असणाऱ्या प्रस्तावांची तसेच आवश्यक इतरही कामांची माहिती देण्यात येणार आहे. जेणेकरून पालकमंत्री शिवपुतळ्याच्या उद्घाटनापुर्वी या परिसराचा सर्वांगिण विकास पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतील, असेही श्री. कुशे म्हणाले.

किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीसाठी मोरयाचा धोंडा याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या पायभरणी समारंभात मालवण देऊळवाडा येथील अभ्यंकर भटजी यांना सन्मान मिळाला होता. आता त्यांच्या नवव्या पिढीतील विलास अभ्यंकर यांना शिवपुतळा उभारणी करण्याच्या ठिकाणी पायभरणी कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान मिळालेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभ्यंकर कुटुंबियांचाही गौरव होत असल्याचे श्री. कुशे यांनी सांगितले.