माझे कोकण| संतोष वायंगणकर
महाराष्ट्रातील कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची चर्चा, राजकिय वक्तव्य आणि भाषण चाळीस वर्षापूर्वी सतत होत असायची. त्यावेळी शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सतत एक प्रश्न पडलेला असायचा. या कॅलिफोर्निया म्हणतत ता आसा तरी कसा ? याचे कारण त्याकाळचा राज्यातून कोकणात येणारा प्रत्येक नेता आमचे काँग्रेसचे सरकार कोकणचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय रहाणार नाही असे नेहमीच भाषणातून सांगण्याचा प्रयत्न करायचे. कोकणवासियांना ही भुलथाप आहे. हे नंतरच्याकाळात कळून आले. सृष्टी सौंदर्याने नटलेलं कोकण हे किती सौंदर्यवान आहे याचीही चर्चा होऊ लागली. कोकणातील समाजवादी विचारवंत बॅ.नाथ पै., प्रा.मधु दंडवते यांनी संसदेतील भाषणांनी एक वेगळा विचार दिला. या विचारांचे गारूड कोकणच्या जनतेवर तब्बल पंचविस वर्षे राहिले. कोकणच्या जनतेला कोकणरेल्वेचे प्रा.मधु दंडवते यांनी दाखवलेलं स्वप्न त्यांच्याच प्रयत्नातून देशाचे अर्थमंत्री असताना सत्यात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला. नंतर कोकणच्या डोंगर-दऱ्या पार करीत अशक्य वाटणारी रेल्वे धावू लागली. परंतु कोकणातील मुलभूत प्रश्न, समस्या यांच निराकरण करण्याचा प्रयत्न मात्र खऱ्याअर्थाने १९९० नंतरच सुरू झाला. १९९५ साली महाराष्ट्रात अनेकवर्षानंतर सत्ता पालट झाला. राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले आणि कोकणातील ना.नारायण राणे यांचा राज्यमंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला. त्यानंतर खऱ्याअर्थाने कोकणच्या विकासाला गती प्राप्त झाली. विकास प्रक्रियेत चाचपडणार कोकण विकासात गती घेऊ लागलं. रस्ते, पाणी, विज या मुलभूत गरजाही लोकांपर्यंत पोहचल्या नव्हत्या. कोकणातील रस्त्यांच जाळ तयार झालं. वाडी-वस्तीवर कंदिलांच्या उजेडाऐवजी विजेच्या प्रकाशाने वाड्या उजळल्या. मैल-दोन मैल पाण्यासाठी होणारी वणवण थांबली. काँग्रेसच्या मंत्रीमंडळातील मंत्री राहिलेल्या स्व.बाळासाहेब सावंत, कै.भाई सावंत, अॅड. एस.एन.देसाई या मंत्र्यांनी त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे विकासप्रक्रिया राबविण्याचा जरूर प्रयत्न केला. परंतु राज्यमंत्रीमंडळात पूर्वीपासून पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांचा मोठ्याप्रमाणावर भरणा होता. मेजॉरीटी पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांची होती. यामुळे कोकणासाठी काही देताना मंत्रीमंडळाचा हात आखडताच होता. मोठा निधी तर कधीच आला नाही. बॅ.ए.आर.अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणविकासासाठी प्रयत्न केले. परंतु त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांनी त्यांच्यासमोर अडचणीच निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सागरी महामार्ग हा बॅ.ए.आर.अंतुले यांचा प्रयत्न. परंतु हा महामार्ग अपूर्णच राहिला आहे. १९९५ साली महाराष्ट्र मंत्रीमंडळात राहिलेल्या ना. नारायण राणे यांनी चौकटीपलिकडे जाऊन कोकण विकासाचा विचार केला. इंग्रजी माध्यमांच्या शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय की ज्यामुळे कोकणातील असंख्य तरूण-तरूणी इंजिनिअर होऊ शकले. सर्वसामान्य गोरगरीबांच्या मुलांसाठी केवळ स्वप्न वाटणारे अभियांत्रिकीचे शिक्षण कोकणातील विद्यार्थ्यांना मिळू शकले. कोकणातील असंख्य तरूण मुलं इंजिनिअर होऊन जॉब करताना दिसतात. विकास म्हणजे फक्त गावातले रस्ते एवढ्या पुरताच विषय पूर्वी असायचा ते विकासाचे वेगळे चित्र ना. नारायण राणे यांनी रेखाटले. आणि सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. १९९८ साली सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून समारंभ पुर्वक घोषित केला. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील घोषित झालेला पहिला पर्यटन जिल्हा आहे. खरंतर कोकणात सर्वकाही असूनही आपल्याकडे काहीच नाही याच भावनेत वावरणाऱ्या कोकणवासियांना पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची एक वेगळी वाट ना. नारायण राणे यांनीच दाखवली हे कुणालाच नाकारता येणार नाही. चिपीचा विमानतळ उभारण्याचे खरे श्रेय ना. नारायण राणे यांच्यापाशीच जाते. जेव्हा चिपी विमानतळाचा प्रकल्प मर्यादित कालावधीत पूर्ण करण्याचा विषय होता. तेव्हा गोव्यात वेगळा विमानतळही प्रस्तावित नव्हता. त्यामुळे कोकणातच आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारला जाणार होता. परंतु कोकणविकासाचे मारेकरी असणारे तिथेही काळेझेंडे दाखवायला सर्वात पुढे होते आणि तेच विमानतळ पूर्ण झाल्यावरही होते. विकास आणि राजकारण हे समानतेने चालत असले तरीही त्याची गल्लत कधीच होता कामा नये. आज कोकण पर्यटन विकासात किती बदलले आहे हे आपण पहातोच आहोत. विकासाचा विचार आणि प्रत्यक्ष कृतिशिलतेने विकास दाखवण्याचे काम निश्चितच ना. नारायण राणे यांनी केले. परंतु फक्त राणेंना विरोध एवढाच ज्यांचा राजकिय अजेंटा असलेल्यांनी कधीच विकासाचा विचार केलाच नाही. कोकणातील प्रकल्प आणण्याचे प्रयत्न राणेंनी केले. परंतु त्याला विरोध करत राजकिय पोळी भाजण्याचे प्रयत्न राणेद्वेषाने पछाडलेल्यांकडुन झाले. विकासाचा विचार करता आला पाहिजे. हा विकासाचा विचार करण्यासाठी आणि प्रत्यक्षात साकारण्यासाठी विकासाचे ‘व्हीजन’ असावे लागते. हे विकासाचे व्हीजन निश्चितच ना. नारायण राणेंमध्ये आहे. जाता-जाता एकच बाब निदर्शनाला आणून देतो कोकणातील पडवे येथे लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची उभारणी यामागेही ना. राणेंची एक भावनिकता आहे. त्यात व्यवहारीकपणा तर निश्चितच कुठेच नाही. कोकणात केवळ विरोधकांशी संघर्ष करत रहाणाऱ्या ना. राणे यांनी तरीही भव्य-दिव्य हॉस्पिटलची उभारणी केली. जेव्हा लाईफटाईम हॉस्पिटल परिसरात कोणीही जातो तेव्हा त्याला आपण एका स्वप्नवत वाटणाऱ्या वास्तु परिसरात आहोत हे समजून येते.जर पैसा कमावणे हाच या हाॅस्पिटल उभारणी मागे हेतू असता तर हाच हाॅस्पिटल प्रकल्प पुणे, मुंबईत उभारला गेला असता. हेही समजून घेण्याची आवश्यकता आहे ही भव्य-दिव्यता फक्त राणेच उभारू शकतात. ही वस्तुस्थिती कुणालाही नाकारता येत नाही. राणेंचा द्वेष करणाऱ्यांनी स्वत: कोकणात आणि कोकणासाठी काय केलय ? हा खरंतर गहन ठरणारा प्रश्न आहे. परंतु विरोधी मानसिकतेत वाढलेल्या आणि वावरणाऱ्या कोकणवासियांनी सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. निवडणुक, राजकारण हे त्या-त्या पातळीवर होत राहिलं. परंतु कोकणाला समाजवादाचा विचार जसा समाजवादी नेते बॅ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते यांनी दिला. तर कोकणच्या विकासाचा कोकणाला ना. नारायण राणे यांनीच दाखवला हे कुणालाही मान्य करावच लागेल












