खेड | प्रतिनिधी : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. याकडे तालुका आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष घालत परिस्थितीत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.
खाडीपट्ट्यात कोरेगाव येथे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात खाडीपट्ट्यातील अनेक गावातील रूग्ण उपचारासाठी येत असतात सद्यस्थितीत भात कापणीचा हंगामही सुरू आहे. बऱ्याचवेळा विंचूदंश, सर्पदंशाच्या घटना घडत आहेत. हे रूग्ण उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात असतात.
मात्र विशेषतः सायंकाळच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा थांगपत्ता नसल्याने रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत आरोग्यसेविकाच रूग्णांना इंजेक्शन देवून उपचार करत असल्याची बाब समोर आली आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जीवितास धोका पोहचण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वरिष्ठ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.










