मडुरेच्या सौ. श्रावणी परब ठरल्या पैठणीच्या विजेत्या

सौ. संजना परब पुरस्कृत ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम संपन्न 

बांदा : प्रविण परब l     मडुरा येथील श्री देवी माऊली मंदिरात आयोजित ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात सौ. श्रावणी अभय परब प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. त्यांना भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते सुमारे १३ हजारांची पैठणी प्रदान करण्यात आली. सौ. रुपाली परेश परब उपविजेत्या ठरल्या.

मडुरा माऊली मंदिरात सौ. संजना परब यांच्यातर्फे ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सौ. संजना परब, सौ. तनुजा पोकळे, नवरात्रोत्सव समिती अध्यक्ष संजू परब, सचिव संतोष परब, सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, देवस्थान समिती अध्यक्ष आनंद परब, खजिनदार सोमनाथ परब, सदस्य दत्ताराम परब, श्री. गुरव, रामचंद्र जाधव, वामन जाधव, पोलीस पाटील नितीन नाईक आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सौ. श्रावणी परब विजेत्या तर सौ. रुपाली परेश परब उपविजेत्या ठरल्या. सौ. तन्वी घनश्याम परब व सौ. पल्लवी पांडुरंग परब यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यावेळी हेमंत मराठे यांच्या बहारदार सुत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. महाआरती नंतर झालेल्या लकी ड्रॉ पैठणीच्या विजेत्या सौ. निकिता नितीन नाईक ठरल्या.

यावेळी श्वेता कोरगावकर यांनी नवरात्रोत्सव समितीचे कौतुक केले. ग्रामीण भागात दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून समितीने आपला वेगळा ठसा उमटवला असल्याचे सांगितले.

दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते झाले. मंदिरात भजने, कीर्तन, दशावतार नाटके, खेळ पैठणीचा, दांडिया, रेकॉर्ड डान्स, फुगडी, महाआरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. नवरात्रोत्सव समितीच्या वतीने उत्सवाचे नीटनेटके नियोजन करण्यात आले होते.