खेड (प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गावरील खवटी येथील हॉटेल अनुसयानजीक इको कारमधून २ किलो गांजाच्या वाहतूकप्रकरणी एकास येथील पोलिसांनी अटक केलेली असतानाच रवींद्र दत्ताराम खळे (३८ रा. वालोपे – वरचीवाडी, चिपळूण) यालाही गजाआड केले. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाच दिवसापूर्वीच इको कारमधून गांज्याची वाहतूक करणाऱ्या रवींद्र सहदेव जाधव (४५, रा. सिद्धार्थनगर – घाटकोपर, मुंबई) याला पाठलाग करत शिताफीने गजाआड केले होते. त्याच्याकडून २७ हजार रूपये किंमतीच्या गांजा, ५ लाख रूपये किंमतीची इको कार व अन्य साहित्य असा ५ लाख ४४ हजार २१२ रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला होता.
पोलिसांनी तपासाला गती दिली असता आणखी एकाचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी जप्त केलेला गांजा रवींद्र जाधव याने चिपळूण तालुक्यातील वालोपे- वरचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या रवींद्र खळे याच्याकडून आणल्याची कबुली दिली होती. त्यानुसार रवींद्र खळे याचा गांजा प्रकरणात सहभाग असल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या रवींद्र खळे यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.










