नरकासूर प्रतिमा मंडळांची पोलिस प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा

मालवण | प्रतिनिधी : नरक चतुर्दशीच्या आदल्या रात्री पूर्वसंधेपासून मालवण शहरामध्ये नरकासूराच्या प्रतिमा दहन करण्यासाठी भरड नाका ते बंदर जेटी पर्यंत नरकासुराची धिंड वाजत काढली जाते. यासाठी परवाणगी मिळावी याबाबत गुरुवारी मालवण पोलीस स्थानकात नरकासूर मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सर्व मंडळांचे मुद्दे लक्षात घेत शनिवारी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११ पर्यंत व १२ नोव्हेंबर पहाटे ५ वाजल्या नंतर परवानगी दिली आहे.

दरवर्षी नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मालवण शहरात नरकासूर प्रतिमा स्पर्धा आयोजित करण्यात येतात त्याचप्रमाणे मुंबई तसेच इतर ठिकाणाहून बँजो वादक बोलविण्यात येतात. त्याचप्रमाणे याही वर्षी त्याच उत्साहात मालवण शहरातील मंडळे नरकासुराच्या प्रतिमा बनवित आहेत. या पार्शवभूमीवर याही वर्षी नरकासुराची धिंड काढण्यास परवानगी मिळावी यासाठी आज मालवण पोलीस स्थानकात मिटिंग आयोजित करण्यात आली होती. यावेळी भरड बॉईज, महापुरुष रेवतळे मित्रमंडळ, बाजार बॉईज, धुरीवाडा बॉईज, गाबितवाडा बॉईज, राजकोट बॉईज, चोरलेक्स कंपनी, दांडी बॉईज, ईस्वटी महापुरुष देऊळवाडा या मंडळांचे सभासद उपस्थित होते. सर्वांनी एकमताने मालवणचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे भरड नाका ते मालवण बंदर जेटी या मार्गावर या वेळेत वाहतुकीचा अडथळा होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी असणारच आहेत परंतु सर्व मंडळांच्या स्वयंसेवकांनी काम करावे तसेच सर्वांनी सहकार्य करावे असे यावेळी श्री. प्रवीण कोल्हे यांनी सांगितले.