३० नोव्हेंबर पर्यंत सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न निकाली लागणार;उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत शिष्टमंडळाची बैठकीत निर्णय
कणकवली : सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाकडून कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमदार गोपीचंद पडळकर ,आमदार सदाभाऊ खोत यांच्यासोबत शिष्टमंडळाने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.एसटी कर्मचारी व अधिकारी त्यांना सरसकट ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान(बोनस) देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती कामगार नेते अशोक राणे यांनी दिली.
आझाद मैदान मुंबई येथे दि.7/11/2023 पासून सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघांचे 16 प्रलंबित मागण्यासाठी आमरण उपोषण झाले. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली.या बैठकीला परिवहन सचिव श्री.जैन , रा. प. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक अजित गायकवाड, सरचिटणीस सतीश मेटकरी,प्रकाश कांबळे, बापू हराळे, आशिष बाळासराफ, अनुप खैरनार, सौ. पद्मश्री राजे आदी अधिकारी उपस्थित होते.
सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या मागण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असणारी २४० दिवसांची अट रद्द होईपर्यंत सदर बढतीस स्थगिती,सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२३ पूर्वी सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाशी बैठक घेऊन निर्णय देण्यात येणार आहे.कॅशलेस मेडिक्लेम योजनेसाठी तालुका, जिल्हास्तरावर रुग्णालयांची निवड करून एस टी कर्मचाऱ्यांची रुग्णालयाची बिले महामंडळ देय करण्यात येतील.घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतन वाढीचा दराची थकबाकीबाबत ३० नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्यात येईल.एसटी महामंडळास स्व-मालकीच्या गाड्या खरेदी करण्यासाठी रुपये ९०० कोटी रुपये देण्यात आले.शिस्त आवेदन पद्धतीबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची नेमणूक केली असून ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत निर्णय घेतला जाईल.रा. प. कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी एका महिन्यात रोख रक्कम अथवा उत्तम दर्जाचा कपडे दिले जातील.अनुकंपा तत्त्वावरील व वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती बाबत ३० दिवसांचे विशेष अभियान राबवून नियुक्ती देण्यात येणार आहे.या मागण्या मान्य झाल्या ने आजच्या बैठकीत सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाने तीन दिवसापासून चालू असलेले उपोषणन स्थगित करण्यात आले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी जो पाठिंबा दिला तो अभूतपूर्व होता. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाकडून सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी आभार व्यक्त केले आहे,असल्याचे श्री.राणे यांनी म्हटले आहे.











