” बळी पहाट “कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातून बहुसंख्य समाज बांधव राहणार उपस्थित

कुणबी कलामंच करणार कलेतून प्रबोधन

संतोष कुळे | चिपळूण : कष्टकरी कुणबी समाजाचे वैचारिक मंथन आणि दिवाळी सणात एकत्रित येण्याचा धागा म्हणजे “बळी पहाट” कार्यक्रम. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई व कुणबी कलामंच आयोजित बळी पहाट हा कार्यक्रम दादर शिवाजी मंदिर येथे १४ रोजी सकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातून बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बळी पहाट ही क्रांतीची पहाट ठरणार आहे. शोध इतिहासाचा.. सत्य संस्कृतीचा ..या क्रांतिकारी वाक्याने कुणबी युवा मुंबई यांनी गेल्या अनेक वर्ष बळी पहाट कार्यक्रम सुरू करून समाजातील वैचारिक प्रबोधन करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. दरवर्षी दिवाळी मध्ये बळी पहाट कार्यक्रमात एक नवीन विषय घेत कुणबी युवा मुंबईची सरचिटणीस संतोष कांबळे यांनी महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे आणि सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा कुणबी कला मंच यांच्या माध्यमातून ही सांस्कृतिक प्रबोधनाची चळवळ उभारली आहे . या चळवळीला आता समाज बांधवांनी सुद्धा डोक्यावर घेतले आहे. बळी पहाट कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सकाळी सहा वाजता गर्दी होते. यातच कुणबी युवा मुंबई युवा आणि कुणबी कला मंचाचे यश दिसून येते दिं. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता शिवाजी मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव हजर राहणार आहेत. यामुळे निश्चितच शिवाजी नाट्य मंदिर आणि तेथील परिसर बळी पहाट च्या कार्यक्रमामुळे फुलून जाणार आहे. क्रांतीचा अथांग सागर आपल्याला या दिवशी पाहायला मिळणार आहे. चिपळूण तालुक्यातील सुद्धा कुणबी युवा चिपळूण तालुका अध्यक्ष संतोष कुळे, आणि त्यांचे सगळे सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.