राष्ट्रीय डाक सप्ताहांतर्गत टपाल व पार्सल दिनाचे औचित्य
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत बुधवारी आंतरराष्ट्रीय टपाल देवाण घेवाणीसाठी सुरु असणाऱ्या ITPS (International Tracked Packaging Services) सेवेअंतर्गत मे. महेश एंटरप्रायजेस यांच्या परदेशी जाणाऱ्या पार्सलचे बुकिंग सावंतवाडी प्रधान डाक घर येथे सुरु करण्यात आले.
सिंधुदुर्ग डाक विभागात ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी टपाल व पार्सल दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बल्क आंतरराष्ट्रीय टपाल सेवेचे उद्घाटन मा. सईद रशीद, पोस्ट मास्तर जनरल गोवा रिजन यांच्या शुभहस्ते सावंतवाडी प्रधान डाकघर येथे करण्यात आले.
या अंतर्गत मे. महेश एंटरप्रायजेस हे जिल्ह्यातील पहिले मोठे ग्राहक म्हणून डाक खात्याशी करारबद्ध झाले असून त्यांच्या आंतरराष्ट्रीय पार्सलचे बुकिंग बुधवार पासून सुरु करण्यात आले आहे. डाक विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा लाभ जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक आणि सामान्य नागरिक यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
तसेच सावंतवाडीकरांना उत्कृष्ट व अविरत टपाल वितरणाची सेवा देणाऱ्या पोस्टमन कर्मचाऱ्यांचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्री. मयुरेश कोले, डाक अधीक्षक, सिंधुदुर्ग विभाग, श्री. विश्वनाथ गिरकर सहा. अधीक्षक, सावंतवाडी उपविभाग, श्री. संदीप कसपले पोस्ट मास्तर सावंतवाडी हे उपस्थित होते.
फोटो – सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बल्क आंतरराष्ट्रीय टपाल सेवेचे उद्घाटन करताना पोस्टमास्तर जनरल गोवा रीजन सईद रशीद सोबत अन्य ( जतिन भिसे )
Sindhudurg