दापोली l प्रतिनिधी :आजारपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दुर्दैवाने अलीकडे वाढले आहे. आजाराबद्दल असलेले गैरसमज किंवा पुरेशी नसलेली माहिती यामुळे नाहक भीती निर्माण होते यातूनच मग आलेल्या नैराश्यातून अशा घटना घडल्या आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना जिल्ह्यात आसूद येथे घडली आहे. मनोज बळीराम जाधव (वय ४० वर्षे रा. आसुद तेलीवाडी ता. दापोली जि.रत्नागिरी) या शेतकरी कुटुंबातील तरुणाने आजारपणाला कंटाळूनच कोणीही घरात नसल्याचे पाहून विषारी कीटकनाशक प्राशन केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. ऐन दीपोत्सवाच्या मुहूर्तावरच आसूद तेलीवाडी येथे राहणाऱ्या जाधव कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मनोज जाधव हा शेतकरी कुटुंबातील विवाहित तरुण होता तो उत्कृष्ट मेकॅनिकही होता टेम्पो दुरुस्त करणे ही त्याची खासियत होती. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास घरात कोणी कोणी नसल्याचे पाहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. याच सुमारास घरातील पत्नी व मुले शेतात कामाकरीता गेले असताना घरी कोणी नसतांना किटकनाशक औषध प्राशान केले काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागलं या घटनेची माहिती शेजारी तसेच कुटुंबाला मिळताच त्याला तात्काळ दापोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अधिक उपचारकरता तात्काळ हलवण्यात आलं होत येथे त्याच्यावरती उपचार सुरू होते. वालावलकर रुग्णालय डेरवण येथे उपचार सुरू असतानाच त्याचा दहा नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
मनोज बळीराम जाधव याच्या पश्चात त्याची पत्नी,दोन लहान मुले, भाऊ ,भावजय असा परिवार आहे. टेम्पो मेकॅनिक असलेला मनोज बळीराम जाधव हा मदतशील स्वभावाचा म्हणून परिसरात सगळ्यांना परिचित होता. त्याला गेले काही दिवस किडनी स्टोनचा त्रास होऊ लागला होता. याच आजारपणाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जाधव कुटुंबातील कर्ता पुरुषच ऐन दिवाळीत सोडून गेल्याने जाधव कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजाणत्या जाणत्या वयातच या लहान मुलांच्या वाट्यालाही हे मोठे दुःख आलं आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आसूद परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.या प्रकरणाची नोंद दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.












