राष्ट्रीय व राज्य पातळीवर नावलौकिक प्राप्त सदस्यांचा करण्यात आला सन्मान
दापोली :– दापोली अर्बन बँक दापोली या देदीप्यमान वाटचाल असलेल्या बँकेची ६६ वी सर्वसाधारण सभा दिनांक १० ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा नवभारत छात्रालय सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभे करता एक हजार पेक्षा अधिक अधिक सदस्य आवर्जून उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला बँकेच्या सदस्यांपैकी ज्या सदस्यांनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विशेष नावलौकिक पटकावला आहे अशा सदस्यांचा विशेष सन्मान दापोली अर्बन बँकेतर्फे करण्यात आला. यामध्ये कोलंबो विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल डॉ. प्रशांत परांजपे, अखिल भारतीय दैवज्ञ समाजाने” देशपातळीवरील नवरत्न हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मिलिंद सैतवडेकर, प्रो गोविंदा मध्ये राज्यस्तरावर नावलौकिक मिळवल्याबद्दल हिंदुराज गोविंदा पथक जालगाव, जिल्हा परिषद शाळा वाकवली PM Shri हा देशपातळीवरील पुरस्कार मिळ्याबद्दल, कबड्डी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मंगेश मोरे , वर्ड पीस ऑफ युनायटेड नेशन्स, ल्युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका या संस्थेने सहकार व सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून “डॉक्टरेट” ही पदवी डॉ.विकास मधुकर शेट्ये यांना प्राप्त झाल्याबद्दल,आंतरराष्ट्रीय पर्यटन गावचा दर्जा मिळाल्याबद्दल कर्दे ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचा तसेच ३४व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी (१९ वर्षाखालील) निवड झाल्याबद्दल श्रेयस अल्पेश लाले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव थोरात यांनी एलएलबी पदवी व जे .ए .आय. आय.बी .परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तसेच बँकेचे लिपीक जितेंद्र बागडे यांनी जे .ए .आय .आय .बी .ही परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचाही विशेष सन्मान सभासदांच्या वतीने करण्यात आला.
बँकेला ३ कोटी ९२ हजाराचा निव्वळ नफा २०२४-२५ या आर्थिक वर्षात झाला आहे. बँकेच्या बारा शाखा असून,बँकेचे ४८ हजार ३४७ सदस्य आहेत .भागधारकांना ९ टक्के डीव्हिडंट देण्यात आला आहे.
बँकेने सातत्याने ऑडिट वर्ग “अ”राखण्याची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. बँकेत ५० हजार रुपये पेक्षा अधिक रक्कम ठेवणाऱ्या सर्व ठेवीदारांना बँकेने पाच लाखाचे अपघाती विमा संरक्षण दिले असून या करिता ४७ लाख रुपयांचा हप्ता बँकेने भरला आहे, भागधारक सभासदांना बँकेकडून दोन लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण तसेच सभासदांच्या ठेवींना डी.आय. सी. जी. सी. चे रुपये पाच लाखाचे विमा संरक्षण देण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.जयवंत जालगावकर यांनी दिली.
सभासदांनी पुढील वर्षी अधिक एक टक्का डिव्हिडंट वाढवून देता यावा अशी मागणी केली. त्याचप्रमाणे नवउद्योजकांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होईल का याचा विचार करावा अशी मागणी सुधीर कालेकर यांनी केली.
डॉ.विकास शेट्ये यांनी थकीत कर्जाचे प्रमाण सध्या पेक्षाही कमीत कमी कसे होईल याकडे लक्ष द्यावे अशी सूचना मांडली. सर्व सूचनांचे अध्यक्ष डॉ.जयवंत जालगावकर यांनी स्वागत करून योग्य तो बदल करण्यात येईल असा आशावाद व्यक्त केला. सभेच्या सुरुवातीला सभासदांच्या कार्यशाळेचे विशेष आयोजन देखील करण्यात आले होते. सभासदांनी बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून पुढील कामकाजाकरीता शुभेच्छा व्यक्त केल्या. माधव शेट्ये यांनी आभार व्यक्त केले. सभेचे कामकाज व्यवस्थापक संभाजीराव थोरात यांनी पाहिले.स्नेहभोजना नंतर सभेची सांगता झाली.












