चिपळूण (प्रतिनिधी) : सुरुवातीच्या टप्प्यातच कॅन्सरचे निदान झाल्यास तो पूर्णतः बरा होतो आणि मृत्यूचा धोका टाळता येतो. त्याचबरोबर उपचाराचा खर्चही वाचतो, म्हणूनच राष्ट्रीय कॅन्सर दिनानिमित्त नागरिकांमध्ये या आजाराविषयी माहिती व्हावी, तसेच लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी या उद्देशाने चिपळूण येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर आणि एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विदयमाने मंगळवारी इंदिरा गांधी संस्कृती केंद्र ते नगर परिषद चिपळूण दरम्यान रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमाला प्रा. प्रियंका माळकरी, लाईफ केअर रूग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित सुर्वे व आँन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरचे सचिन पोकळे तसेच अॅडमिन विभागातील आनंद सावंत यांची उपस्थिती होती. चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते चिपळूण नगर परिषद आयोजित रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कॅन्सरविषयी जनजागृती केली. यानिमित्त व्यसनांपासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला देण्यात आला. कॅन्सरच्या विरोधात लढा देण्यापेक्षा त्याची लक्षणे दिसताच त्याचे तत्काळ निदान करणे हा कॅन्सरला प्रतिबंध करण्याचा उत्तम पर्याय आहे. नागरिकांनी आरोग्याची नियमित तपासणी करण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले. तसेच कॅन्सर आजार लपवण्यासारखा नसून, वेळीच निदान आणि योग्य उपचार करणे आवश्यक असल्याचे, आँन्को लाईफकेअर कॅन्सरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन देशमुख यांनी म्हटले.












