टोप ते गोवा अशी २०० किमीचा प्रवास
बांदा : प्रविण परब : पेठ वडगाव (जि. कोल्हापूर) येथील ट्रेल हंटर्स ग्रुपचे सदस्य आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीसाठी टोप ते गोवा अशी २०० किमी अंतराची सायकल राईड करत आहेत. शनिवारी सायंकाळी ते महाराष्ट्र – गोवा सीमेवर बांदा येथे दाखल झालेत.
या फेरीत ट्रेल हंटर्स ग्रुपचे प्रमुख डॉ. प्रदीप पाटील, डॉ. मिलिंद कुंभार, डॉ. अभय पाटील, डॉ. उमेश खताळ, डॉ. सत्यदीप चिकबीरे, डॉ. सुनील महापुरे, डॉ. अमित सूर्यवंशी, डॉ. श्यामप्रसाद पावशे, केरबा पाटील, नंदकुमार साळुंखे, कृष्णात पाटील, प्रताप पाटील, मधुकर माळी, संकेत घाटगे, डॉ. महेश थोरात, योगेश डूणूंग, राहुल नेजकर, वीरेंद्र चौगुले, राहुल चौगुले, केतन पाटील, पवन जंगम, ओंकार पाटोळे, आदित्य चौगुले, नितीन बोभाटे, डॉ. मल्लिकार्जुन काळगी, गणेश कुकडे, सर्जेराव पाटील आदी सहभागी झाले आहेत.
याबाबत डॉ. पाटील यांनी सांगितले की, दररोज प्रत्येकाने किमान २० किमी सायकल चालविणे आरोग्यासाठी हितावह आहे. सायकलिंगमुळे शरीरासह मेंदूतील नसा कार्यक्षम होतात. माणूस निरोगी राहतो. आळस जाऊन संपूर्ण दिवस ताजातवाना जातो. तसेच आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर होतात. ट्रेल हंटर्स ग्रुपतर्फे दरवर्षी आरोग्य व पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ते गोवा येथे रवाना झालेत.











