सचिन रेडकर । सावंतवाडी : प्रागैतिहासिक काळापासून मानव विविध रूपांतील देवतांची आराधना करत आला आहे. स्त्रीच्या सृजनशक्तीचा आदर करण्यासाठी म्हणूनच त्याने शक्तीची पूजा करायला सुरुवात केली असावी. महाराष्ट्रात देवींची साडेतीन पीठे मानली जातात. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता यांना साडेतीन शक्तिपीठे म्हणून संबोधले जाते. तर नवदुर्गांच्या स्वरूपात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री ही देवीची नऊ रूपे दिसून येतात. मात्र, त्याचबरोबर गावागावात भक्तांच्या रक्षणासाठी भक्तीचे प्रतीक म्हणून गावातील मंदिरात देवी विराजमान असते. भवानी, माऊली, सातेरी, पावणाई, भद्रकाली,भराडी अशा विविध रूपातून ती गावागावातील भक्तांच्या रक्षणासाठी उभी राहते. मग ही रूपं नवदुर्गांच्या स्वरूपात आढळतात किंवा गावातील मंदिरांमध्ये मूर्ती रुपात कधी वारुळांच्या रूपाने भक्तांसाठी स्थायिक होतात.
अशाच पाषाणमूर्तीच्या रुपात शक्ती बनून आपल्या समोर उभी आहे ती सोनुर्ली येथील आदिशक्ती आदिमाया महिषासुरमर्दिनी ‘श्री देवी माऊली’.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या व सांस्कृतिक माहेरघर ठरलेल्या
कोकणात अनेक देवतांची सुप्रसिद्ध स्थळे आहेत. त्यात अगदी तळकोकणात सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असेलेले सोनुर्ली हे गाव महिषासुरमर्दिनी श्री देवी माऊलीच्या पावन वास्तव्याने पुनित झाले आहे. नवसाला पावणारी माऊली म्हणून प्रसिद्धीस पावलेले श्री देवी माऊलीचे हे मंदिर भाविकांचे तीर्थक्षेत्र बनले आहे.
भक्तीचे अनेक प्रकार असले तरी भक्तीचा उगम हा निस्सीम अशा श्रद्धेतून होत असतो आणि ही श्रद्धा जेव्हा शक्तीतून प्रकट होते तेव्हा ती शक्ती आपल्या समोर देवीच्या रूपात प्रगट होते. अशीच भक्तीत रममाण होणाऱ्या भक्तांना कल्याणमस्तूचा आशीर्वाद देत हित साधत भक्तांच्या कल्याणार्थ…रक्षणार्थ उभी असलेली श्री देवी माऊली म्हणजेच या दशक्रोशीसह अवघ्या महाराष्ट्रातील भक्तगणांची आई ‘
सोनुर्ली बाये ‘. बाये आवशी म्हणून आर्त हाक दिल्यावर भक्तांच्या संकटाला धावून जाणारी व नवसाला पावणारी ही माऊली म्हणूनच तर अवघ्या भक्तगणांची आई होऊन या सोनुर्ली क्षेत्रात विराजमान झाली आहे. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिणी भगवतीचे मंदिर आहे.
या भव्य व आकर्षक मंदिराच्या गाभाऱ्यात एक सुंदर चतुर्भुज रूपातील महिषासुरमर्दिनी आई माऊलीच्या रूपात उभी ठाकली आहे. तिने हातांमध्ये वज्र, खड्ग, त्रिशूळ, ढाल यासारखी आयुधे घेतली आहेत. तर तिचा डावा पाय महिषासुराच्या डोक्यावर ठेवलेला आहे. उजव्या हातातील खडगाने ती त्याचा वध करते आहे. मात्र, महिषासुरमर्दिनी रुपात ती असली तरीही या ठिकणचं तिचं हे महिषासुरमर्दिनी रूप ‘रुद्र’ दिसत नसून भक्तांच्या कल्याणासाठी वात्सल्यरुपी माऊलीचा करुणाभाव तिच्या चेहऱ्यावर प ओत-प्रोत भरून राहिला आहे. मस्तकी मुकुट, कानी कुंडले, गळ्यात कंठा व अन्य आभूषणे ल्यालेल्या माऊलीचे प्रसन्न रूप पाहिल्यावर देहभान विसरले जाते.
कोकणची दक्षिण काशी म्हणूनही सोनुर्ली माउली देवस्थान प्रसिद्ध आहे. पर्यटन विकासाच्या माध्यमातून मंदिराच्या सभोवतालचा परिसर, भक्तनिवास व मुख्य रस्त्याचे काम होऊ घातले आहे. यातूनच पर्यटन व धार्मिक स्थळाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. या ठिकाणी विजेची सेवा, भाविकांच्या निवासासाठी धर्मशाळा, मुबलक पाणी, परिसराचे सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. आकर्षक असे माऊलीचे मंदिर बाहेरचा सभा मंडप व त्यानंतर प्रवेशद्वाराच्या जागी नव्याने सागवान लाकडाच्या सुंदर नक्षीकामाने सजलेल्या गाभाऱ्याच्या कमानीतून मंदिराच्या गाभाऱ्यात शिरताच जागृत देवस्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या श्री देवीचे मनमोहक रूप पाहताच मन प्रसन्न होते. दूरवरून आलेला भाविक माऊलीच्या दर्शनाने कृतार्थ होतो.
श्री देवी माऊली मंदिराच्या बाजूला श्री रवळनाथ, श्री लिंगायत, श्री पावणादेवी यांचीही मंदिरे आहेत. सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावांचे आद्यदैवत म्हणून श्री देवी माऊलीला मानले जाते. सुमारे ५०० वर्षांपूर्वीच्या श्री देवी माऊलीच्या पुरातन मंदिराची वास्तू भव्य दिव्य व्हावी, असा काही वर्षांपूर्वी भक्तगणांनी संकल्प सोडला. माऊलीच्या कृपेने तमाम भक्तगणांच्या सहकार्यातून हा संकल्प पूर्णत्वास आला आहे. हे मंदिर भव्यदिव्य असे असून मंदिराचा गाभारा राजस्थानी कारागिरांच्या मदतीने फारच आकर्षक असा केला आहे. गाभाऱ्यात शिरताच जागृत देवस्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या श्री देवीचे रूप पाहताच मन प्रसन्न होते. दूरदूरवरून आलेला भाविक माऊलीच्या दर्शनाने कृतार्थ होतो.
माऊलीचे हजारो भक्तगण सदैव माऊलीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव ही तर सर्व भक्तगणांसाठी पर्वणीच ठरते. जत्रोत्सवाव्यतिरिक्त या ठिकाणी देव दीपावली, हरिनाम सप्ताह, होळी उत्सव आदी धार्मिक कार्यक्रमही होतात. कोजागरी पौर्णिमा, दीपावली, तुलसी विवाह यासारखे कार्यक्रम देखील मोठ्या भक्ती भावाने येथे साजरे होतात. नवरात्रोत्सवात देखील अनेक भक्तगण देवी माऊलीच्या दर्शनासाठी येतात. तिच्या मनमोहक रूपाने धन्य होऊन तिचा आशीर्वाद घेऊन भक्तगण माघारी फिरतात.
आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसेच मनःशांतीसाठी देवी माऊलीकडे लोटांगणाचा नवस बोलण्याची प्रथा आहे. हा नवस जत्रेला फेडला जातो.त्यामुळे ही जत्रा ‘लोटांगणाची जत्रा ‘ म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो भक्तगणांची लोटांगणे ‘याची देही याची डोळा ‘ पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. जत्रेदिवशी तर सोनुर्ली गावात अक्षरशः पर्वणी असते. देवीची मूर्ती स्थानापन्न केलेल्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढत मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते, यावेली मंदिरासमोरील दीपस्तंभ दीपज्योतीनी उजळतो. त्यानंतर भक्ती भावाने माऊलीच्या चरणी लोटांगण घातले जाते. हजारो पुरुष भाविक लोटांगण घालून तर महिला भाविक उभ्या राहून मंदिराला प्रदक्षिणा घालून लोटांगणाचा नवस फेडतात.
या दिवशी सोनुर्ली पंचक्रोशीत नवचैतन्य पसरते. सोनुर्ली गावात मोठ्या उत्साहात हा जत्रोत्सव साजरा केला जातो. या दिवशी देवीचा भक्त जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी माऊलीच्या दर्शनासाठी येतोच येतो. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांच्या लांबच लांब रांगा मंदिर परिसरात पहायला मिळतात. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी तुळाभार कार्यक्रमाने जत्रेची सांगता होते.
दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर अशी ओळख असलेल्या सोनुर्ली देवी माऊलीचे मंदिर असलेला सोनुर्ली गावही आपले वेगळेपण जपत आहे. श्री देवी माऊलीच्या कृपाशीर्वादामुळे सोनुर्ली गावाची महती राज्याच्या कानाकोपऱ्यात तसेच गोवा, कर्नाटकातही पसरली आहे.
कोकण म्हटले की, कौलारू घरे, मातीच्या भिंती हे चित्र सहज डोळ्यांसमोर तरळते. पण आज सर्वत्र बिल्डरांचे प्रस्थ वाढले असल्याने स्लॅबच्या घरांचे जाळे पसरत चालले आहे. सोनुर्ली गाव मात्र त्याला अपवाद आहे. येथे स्लॅबचे घर नावाला सापडणार नाही. येथे मातीच्या भिंतींचा हळूहळू कायापालट होऊ लागला असला तरी या गावात भिंतीसाठी चिऱ्याचे दगड वापरले जात नाहीत. घरांच्या छप्परावर नळेच असावेत असा गाववासियांचा आजही आग्रह असतो. या परंपरेची जपणूक गाववासीय मोठ्या श्रद्धेने करतात. विटांची घरे येथे पाहावयास मिळतात. ‘खेड्यामधले घर कौलारू’ कसे असावे ते पाहावे तर इथेच! सुंदर सुंदर पहुडलेली घरे डोंगरमाथ्यावरून पाहताना तर चित्त हरपते. येथे स्लॅबची घरे बांधण्यास देवीचा कौल मिळत नाही.
अशी वेगळी ख्याती ल्यालेल्या या देवीमाऊलीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात. नवरात्रोत्सवात देखील महाराष्ट्राच्या अनेक भागातून या देवीच्या दर्शनासाठी भाविक येतात. कर्नाटक गोव्यातूनही भाविक श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी येत असतात. मुंबईहून गोव्याकडे जाणारा एखादा पर्यटक असो व येणारा वाटसरू तो देवी माऊलीचे दर्शन घेण्यासाठी सोनुर्लीला नक्कीच जातो. अशी नवसाला पावणारी व भक्तांची माय माऊली असलेली जगत जननी अंबाबाईचे महिषासुर मर्दिनी रूप लिहिलेली श्रीदेवी माऊली भक्तगणांच्या हाकेला धावणारी ‘सोनुर्ली बाये ‘ भक्तांची रखवाली बनून सोनुर्लीत गावात स्थित झाली आहे.
सावंतवाडी शहरापासून मळगाव येथे आल्यावर झाराप ते पत्रादेवी बायपासवरून काही अंतर पुढे गेल्यावर वेत्ये गावातून सोनुर्लीला जाता येते. हा सर्वात जवळचा मार्ग आहे. तर सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकातून निरवडेमार्गे तसेच न्हावेली येथून देखील सोनुर्ली गावात जाण्याचा मार्ग आहे. गोमंतकातून आल्यावर कोंडुरे आरोसमार्गे ना न्हावेली येथून सोनुर्ली गावात जायचा रस्ता आहे. सावंतवाडी बस स्थानकावरून या ठिकाणी नियमितपणे एसटी बस येत असते. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात या तीर्थक्षेत्रात येऊ असतात.
सध्या शारदीय नवरात्रोत्सवात संपूर्ण देशभरात देवींचा जागर होत असताना सोनुर्ली येथील माय माऊलीच्या दर्शनासाठीही भाविक भक्तगणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येते. आपल्या लाडक्या सोनुर्ली माऊलीच्या दर्शनाने धन्य झालेला भाविक भक्तगण पुन्हा दर्शनाची आस ठेवून गावी परततो.












