रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर दिनांक 16 ते 22 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिर, कुर्धे येथे सुरु आहे. याअंतर्गत ४० फुटी बंधारा बांधण्यात आला. 11 वी व 12 वीतील या छोट्या स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
राज्यातील पाणी टंचाई कमी व्हावी, भूजलाची खालावलेली पातळी वाढावी या साठी महाराष्ट्र शासनातर्फे जलयुक्त शिवार, पाणीदार गाव यां सारखे उपक्रम राबवले जात आहेत. या शिबीरामध्ये विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे फायदे कळावे व गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्न कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी दि. 20 व 21 नोव्हेंबर 2023 असे दोन दिवस सकाळी 8.00 ते 12.00 असे प्रत्येकी 4 तास श्रमदान करुन कुर्धे गावातील लिंगायत वाडी व खोताची वाडी शेजारी 40 फुटांचा बंधारा बांधला. यामुळे 100 मिटरपर्यंत लांब पाणी साठा झाला आहे. या बंधारार्यामुळे शेजारील वाडीतील विहीरींच्या भूजलपातळीत वाढ होऊन पाणी मे अखेर पर्यंत पूरण्याची तरतुद झाली आहे.
श्रमदानाला कुर्धे गावातील 92 वर्षांचे आजोबा शिवराम लिंगायत, प्रतिक फडके यांनी स्वयंसेवकांसोबत श्रमदान केले. तसेच मुलांचे कौतुक केले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 52 स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजीत भिडे, प्रा. अन्वी कोळंबेकर, प्रा. अनुष्का टिकेकर यांनी सहभाग घेतला. श्रमदानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी विद्यार्थी पूर्वा सावंत, योती घडशी, साक्षी पंडीत, आकाश मणचेकर, प्रथमेश बाणे, दिव्येश भोंबल, ऋषी रांबाडे, निकी बाणे, सुहानी गुरव, जय खाडे, यांनी श्रमदानात सक्रीय सहभाग घेऊन बंधारा वेळेत पूर्ण होण्यासाठी मोलाची मदत केली.












