प्रवासी दूर झाल्याने सुदैवाने अनर्थ टळला
सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसच्या बाहेरील बाजूस करोडो रुपये खर्च करून सुशोभिकरणाचे काम सुरु असताना स्टेशनच्या मुख्य इमारतीची मात्र दुरावस्था झाली आहे. बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास या स्थानकाच्या दर्शनी पोर्चचे सिलींग अचानक ढासळले. याच वेळी मडगांव जनशताब्दी एक्सप्रेससाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी व नातेवार्दक स्थानक परिसरात उपस्थित होते. याच वेळी ही घटना घडली. त्या ठिकाणीही काही व्यक्ती उभ्या होत्या तर काहीजणलगतच्या बेंचवर बसले होते.
सिलींग ढासळत असल्याचे पाहताच त्यांनी बाजूला धाव घेतली त्यामुळे कोणी जखमी झाले नाहीत. या प्रकारामुळे प्रवासी व नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत होता. करोडो रुपये खर्च करून स्थानकाचे सुशोभीकरण करण्यापेक्षा स्थानकाची मूळ इमारत दुरुस्त करा तसेच प्रवाशांना पावसात व उन्हात उभे राहण्यासाठी ल्पॅटफॉर्मवर निवारा शेड तसेच इतर सुविधा देण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.












