रत्नागिरी : निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले असून, संबंधितांनी ट्रू वोटर ॲप डाऊनलोड करुन त्याद्वारे तात्काळ निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावा, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक कार्यक्रमानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसहित) निवडणुकीचा निकाल घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावयाचा आहे. खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ट्रु वोटर ॲप डाऊनलोड केल्याचे प्रमाण खूपच नगण्यअसल्याचे दिसून येत आहे. यासाठी गुगल/ॲपल प्लेस्टोअर वरुन ट्रू वोटर ॲप डाऊनलोड करुन त्याद्वारे खर्चाचा हिशोब सादर करावयाचा आहे. तसेच पोट निवडणूकीमधील निवडणूक खर्चाचा हिशोब पारंपरिक पध्दतीने सादर करावा. तरी सर्व संबंधित तहसिलदार, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक लढविणारे उमेदवार (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसहित) यांनी याची नोंद घ्यावी.












