भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी व्यक्त केला ठाम विश्वास
मालवण | प्रतिनिधी : मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हे निलेश राणेच आहेत. निलेश राणे यांच्या आमदार रूपाने मालवण कुडाळ मतदारसंघात भाजपाचा विजय निश्चित आहे. असा ठाम विश्वास भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.
गुरुवारी मालवण येथे दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले भारतीय जनता पार्टीकडून कुडाळ मालवण विधानसभेसाठी निलेश राणे यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. निलेश राणे विधानसभा प्रमुख म्हणून या मतदारसंघात करत असलेले काम व सर्व कार्यकर्ते यांची मागणी विचारात घेता पक्षश्रेष्ठी त्यांनाच उमेदवारी देतील. निलेश राणे निश्चितच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. असा ठाम विश्वास भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.
निलेश राणे आणि मी एकाच नाण्याची एकच बाजू आहोत. आमचे नाते अधिक घट्ट आहे. मात्र उबाठा सेना सोशल मिडीयाचा वापर करून आमच्यात कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. उबाठा सेनेचे येथील
अकार्यक्षम आमदार, खासदार यांना फायदा व्हावा हा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यांचा उद्देश सफल होणार नाही. मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या आचरा ग्रामपंचायतवर जनतेने भाजपचा झेंडा फडकवला. उबाठा सेनेचा पराभव केला त्याच प्रमाणे मालवण कुडाळ मतदारसंघात निलेश राणे यांच्या रूपाने भाजपाचा विजय निश्चित आहे. असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजप तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजू बिडये, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, संदीप मालंडकर, कमलाकर कोचरेकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.











