श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा येथे उद्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शासकीय पूजा

श्री मोरयाचा धोंडा नियोजित दालनाचे होणार सादरीकरण : उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजानी 350 वर्षपूर्वी किल्ले सिंधुदुर्गच्या पायभरणीचे पुजन मालवण किनारपट्टीवर केले. 25 नोव्हेंबर 1664 रोजी किनार्‍यावरील एका मोठ्या दगडावर गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करत महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचा मुहूर्त केला. दांडी-वायरी किनारी तो पुजन झालेला दगड आजही समुद्री लाटां अंगावर घेत श्री क्षेत्र मोरेश्वर ‘मोरयाचा धोंडा’ नावाने आपले ऐतिहासिक अस्तित्व दर्शवत आढळस्थानी आहे. या ऐतिहासिक स्थानाला 2017 या वर्षी शासकीय पूजेचा मान मिळाला. या वर्षी वर्धापनदिनी (25 नोव्हेंबर) पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्री मोरेश्वर येथे सकाळी 10 वाजता शासकीय पूजा होणार आहे. यावेळी श्री मोरयाचा धोंडा येथील नियोजित दालनाचे सादरीकरण ही होणार आहे.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर, किल्ले प्रेरनोत्सव समिती अध्यक्ष गुरुनाथ राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ढोल ताशांच्या गजराता तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात, शिवप्रार्थनेसह हा सोहळा संपन्न होणार आहे. शिवप्रेमी नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन किल्ले प्रेरणोत्सव समिती पदाधिकारी विजय केनवडेकर यांनी केले आहे.