बायेच्या चरणी हजारो भक्तगण घालणार ‘ लोटांगण ‘
सावंतवाडी । प्रतिनिधी : दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव आज मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून माऊली चरणी दरवर्षी हजारो भक्तगण नतमस्तक होतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी जत्रा म्हणून सोनुर्ली श्री देवी माऊलीची जत्रा प्रसिद्ध आहे. वरदायिनी माता असलेल्या सोनुर्ली माऊलीचे महात्म्य सातासमुद्रापार पोहोचले असून आपल्या मनोकामना पूर्ण होवोत यासाठी साकडे घालण्यासाठी देवीकडे भक्तजनांकडून लोंटागणाचा नवस केला जातो आणि जत्रोत्सवादिवशी रात्री तो फेडला जातो. महिला उभ्याने मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून हा नवस फेडतात तर पुरुष जमिनीवर लोटांगण घालून नवस फेडतात. हा लोटांगण कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भक्त गर्दी करतात.

जत्रोत्सवानिमित्त देवीच्या मंदिराला केली जाणारी आकर्षक रोषणाई, पालखी येताना केली जाणारी आतषबाजी व लोटांगणाचा उत्सव आणि या सोबत देवीचे साजश्रुंगार केलेले रमणीय रुप डोळ्यात साठवून भाविक तृप्त होतात. त्या साठीच हा सोहळा ‘याची देही याची डोळा ‘ पाहण्यासाठी लाखो भक्तगण गर्दी करीत असतात.
त्यामुळे या जत्रोत्सवाला लोटणारी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाकडूनही योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. तर देवस्थान कमिटीकडूनही भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी दर्शन मंडप तसेच इतर योग्य नियोजन केले जाते. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान कमिटीकडून त्या दृष्टीने मंदिर पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी सिंधुदुर्ग पोलिसांनीही पूर्णपणे नियोजन केले आहे. तसेच भाविकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. या जत्रेसाठी सावंतवाडी तालुक्यासह जिल्हाभरातून भाविक येत असतात यासाठी एसटी महामंडळाने ही दरवर्षीप्रमाणे विशेष व्यवस्था केली आहे.












