राधाकृष्ण नगरातील पालिकेच्या गटारातील सांडपाण्याची टाकी काढली

उमेश सकपाळ यांचे नागरिकांनी मानले आभार

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील राधाकृष्ण नगर येथे बिल्डरने पालिकेच्या गटारात सांडपाण्याची टाकी बांधली. स्थानिकांनी माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांच्याशी संपर्क साधला. श्री. सकपाळ यांनी पालिका प्रशासनाच्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिली व ही टाकी काढण्यास भाग पाडले. स्थानिकांनी याबाबत श्री. सकपाळ यांच्यासह पालिका प्रशासनाचे आभार मानले.

शहरातील राधाकृष्ण नगरमधील बिल्डरने चिपळूण नगर परिषदेच्या गटारातच सदनिकेच्या सांडपाण्याची टाकी टाकण्याचे काम सुरु केले होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी याला आक्षेप घेतला व पालिकेच्या गटारातून सदर टाकी काढण्यास बिल्डरला सांगितले. परंतु बिल्डरने टाकी काढण्यास नकार दिला म्हणून नागरिकांनी विविध लोकप्रतिनिधीशी संपर्क साधला, तरीही सांडपाण्याच्या टाकी काढण्याचे काम झाले नाही.

अशावेळी सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी उमेश सकपाळ यांना या विषयाची माहिती दिली. उमेश सकपाळ यांनीही चुकीच्या पद्धतीने काम झाले असेल तर आजच्या आज टाकी काढण्यास प्रशासनाला भाग पाडू, असा शब्द दिला. अखेर सायंकाळी स्थानिक नागरिकांसहित श्री. सकपाळ, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, सुयोग चव्हाण, कपिल शिर्के, महेश सकपाळ, दीपक किंजळकर, धिरज नलावडे व नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी जाऊन पाहणी केली. प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी सदर काम चुकीच्या पद्धतीने झालेले असून लगेच नगर पालिकेची यंत्रणा लावून हे काम काढून टाकले. उमेश सकपाळ यांनी तातडीने दखल घेतल्याने स्थानिक नागरिकांना श्री. सकपाळ यांच्यासह पालिका प्रशासनाचे आभार मानले.