ओवळीत अवैध खैर लाकूड जप्त; दोघांवर गुन्हा

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओवळी फाटा येथे विनापरवाना अवैधरित्या तोड करून वाहतूक करण्यात येत असलेले खैराचे लाकूड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास घडली.

वनक्षेत्रपाल चिपळूण यांना दूरध्वनीव्दारे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण, वनपाल चिपळूण, वनरक्षक कोळकेवाडी यांनी तत्काळ ओवळी फाटा येथे जावून तेथे थांबलेल्या पिकअप (क्रमांक एमएच ०८ डब्ल्यू ९३९३) ची तपासणी केली असता. गाडीच्या हौद्यामध्ये विनापासी, बिगरशिक्का असलेला खैर (साड) लाकूडमाल आढळून आला. वनरक्षक यांनी हौद्यातील खैर लाकूडमाल मोजमापे घेवून, सदरचा लाकूड माल व गाडीमधील लोखंडी वजनकाटा व वजन मापे गाडीसह जप्त करुन ताब्यात घेतले.

सदर प्रकरणी वनरक्षक कोळकेवाडी यांच्याकडील अपराधी वाहनचालक यतिराज तुकाराम होडे (रा. वेहेळे) व दिलीप बाब्या पवार (रा. ओवळी) यांच्या विरुध्द भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) (ब) अन्वये गुन्हा नोंद केला. सदर प्रकरणी पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण राजश्री किर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दौ. रा. भोसले, वनरक्षक राहुल गुंढे करीत आहेत. ही कारवाई विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष अधिकारी तथा परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर, वनपाल दौ. रा. भोसले, वनरक्षक राहुल गुंढे यांनी पार पाडली आहे.