दाणोली येथील कार चालकावर गुन्हा दाखल
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी आंबोली मार्गावर धवडकी येथे इनोव्हा कारची धडक बसल्याने माडखोल येथील बाबुराव धोंडी राऊत (६८) यांचे निधन झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी दिनानाथ राजाराम बल्लाळ (वय ५८, रा. दाणोली बाजार ) यांच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाबुराव राऊत हे बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घरासमोर असलेल्या नदीच्या परिसरात फुले काढण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा कारचा आरसा त्यांच्या दुचाकीला धडकला व ते रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर ते उभे राहून थोड्यावेळाने काही अंतरावर पुन्हा चालत गेले व पुन्हा कोसळले.
यावेळी कारचालक दिनानाथ बल्लाळ यांनी त्यांना सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, राऊत यांच्या अपघातास व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक दिनानाथ बल्लाळ यांच्यावर सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












