फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : येथील श्री देव राधाकृष्ण मंदिरात, गेले महिनाभर उदंड उत्साहात, पार पडलेल्या काकड आरतीची सांगता नुकतीच करण्यात आली.मागील पिढीकडून घेतलेल्या संस्काराचा वसा आनंदात उत्साहात आणि बहुसंख्येने उपस्थित राहून, बालगोपाल मंडळी पार पाडत आहेत.कार्यकर्त्यांचे मनस्वी कौतुक करताना, फोंडा वासियानी सार्थ अभिमान व्यक्त केला.
अश्विन पौर्णिमा (कोजागिरी) ते कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा यादरम्यान गेली कित्येक वर्षे ही काकड आरती सुरू आहे .या मासामध्ये सणांच्या उत्साहाबरोबरच काकड आरतीच्या निनादाने,टाळ मृदंगाच्या गजरात पहाटे आसमंत भक्तिमय होतो.
भक्तगणांच्या आर्त आळवणीने भजनातून आणि आरतीतून देवाला जागे करण्यासाठी हा सोहळा ! या काकड आरती ला पंचक्रोशीतून अबाल वृद्धांसह उवाई आणि लहान बच्चे कंपनी आवर्जून उपस्थित असतात. विविध प्रकारचा प्रसाद आणि फराळ हे या आरतीचे वैशिष्ट्य असते.
प्रसाद देण्यासाठी सुद्धा भाविकांची मांदियाळी असते. पहाटेच्या पारी– देवाचिये द्वारी | उभा क्षणभरी | तेणे मुक्तीचारी | साधीयेल्या | –असा विश्वास भाविकांमधून व्यक्त होतो. महिनाभर सुरू असलेल्या काकड आरतीचा समारोप झाल्यानंतर दुपारी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन, या उत्सवाची सांगता झाली…












