कार्यकारी अभियंता अनामिक चव्हाण यांची
त्वरीत कार्यवाही करण्याची ग्वाही
सावंतवाडी । प्रतिनिधी : प्रशासनाच्या लाल फितीत अडकलेल्या शिरशिंगे शिवापूर रस्त्याच्या कार्यवाही बाबत कोणतीही हालचाल प्रशासनाकडून दिसत नसल्याने सावंतवाडी व कुडाळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत प्रजासत्ताक दिनी पुकारलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी या प्रश्न त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने अखेर हा निर्णय घेण्यात आला. हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असले तरीही योग्य वेळेत कार्यवाही न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने दिला.
सावंतवाडी कुडाळ तालुक्याला जोडणारा शिरशिंगे ते शिवापुर असा रस्ता गेली पाच वर्षाहून अधिक काळ रेंगाळलेला होता. सदरचा रस्ता साडेतीन किलोमीटर वन जमिनीमध्ये अडकला असून हा रस्ता झाल्यास दोन तालुक्यांची गावे एकमेकांना जोडली जाणार आहेत. तसेच ऐतिहासिक मनोहर संतोष गडाकडे जाणारा हा मार्ग आहे. या रस्त्या संदर्भात मंत्रालय स्तरावर वन संज्ञा जमीनीबाबत अनेक बैठका होऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर दोन्ही गावच्या व पंचक्रोशीच्या ग्रामस्थांनी येत्या २६ जानेवारीला आंदोलन उभारण्याचे निश्चित केले होते.
मात्र, मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याशी झालेल्या दोन्ही तालुक्याच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत हा रस्ता व वन संज्ञा जमीन प्रश्न येत्या महिन्याभरात पूर्ण करून लवकरच या ऐतिहासिक मार्गाचे काम हाती घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे सदरचे आंदोलन तीन मार्चपर्यंत तुर्तास स्थगित ठेवण्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
या शिष्टमंडळात सावंतवाडीचे माजी सभापती तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी सभापती मोहन सावंत, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, शिवसेनेचे विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पेडणेकर, अंकुश परब आदी उपस्थित होते.
Sindhudurg