रत्नागिरी : पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत कातळशिल्प परिसर व्यवस्थापन आणि विकास उपक्रमाअंतर्गत 17 गांवांपैकी ऊक्षी कातळशिल्प ठिकाण क्रमांक दोन येथे कामाचा शुभारंभ झाला.
ऊक्षी कातळशिल्प असलेल्या जागेचे मालक श्री काशीनाथ देसाई आणि कुटुंबीय, माजी सरपंच श्री मिलिंद खानविलकर, माजी उपसरपंच श्री हरिश्चंद्र बंणबे, श्री मंगेश नागवेकर, गावकर श्री. गणपत घाणेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री पोमेंडकर, पुरातत्व विभाग रत्नागिरी येथील अधिकारी श्री केकडे, ठेकेदार प्रतिनिधि श्री. देविदास मोर , श्री ऋत्विज आपटे , श्री सुधीर रिसबुड तसेच ऊक्षी गावाचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ऊक्षी ठिकाण क्रमांक 2 येथील कातळशिल्प परिसर व्यवस्थापन आणि विकास उपक्रमाअंतर्गत कामाची सुरवात जागेचे मालक श्री देसाई यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून करण्यात आली.
या प्रसंगी गावातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या छोटखानी कार्यक्रमात श्री सुधीर रिसबुड आणि श्री मिलिंद खानविलकर यांनी कातळशिल्प परिसर व्यवस्थापन आणि विकास उपक्रमाची माहिती ग्रामस्थांना दिली तसेच कातळशिल्प परिसराचा विकास आणि त्यात ग्रामस्थांना सहभाग कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कामाची सुरवात किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते करावयाचे होते. प्रकृती अस्वाथ्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत परंतु दूरध्वनी संपर्क माध्यमातून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली व कामासाठी शुभेच्छा दिल्या.
सांस्कृतिक कार्य मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संचालक, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत कातळशिल्प परिसर व्यवस्थापन आणि विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्यात 17 गावातील कातळशिल्प ठिकाणांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत कातळशिल्प ठिकाणचे स्थान विचारात घेऊन आवश्यक बाबींचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार कातळशिल्प ठिकाणांच्या आवश्यकते नुसार संरक्षित कठडा, माहिती फलक, दिशा दर्शक फलक, स्वच्छतागृह, विविध उपयोगी शेड अशा बाबींचा समावेश आहे या नियोजनात करण्यात आला आहे. या उपक्रमातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जागा मालकांची जागा अधिग्रहीत न करता मालकी हक्क अबाधीत ठेवण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरवात ऊक्षी ठिकाण क्रमांक दोन पासून करण्यात आली आहे.
गेली काहीवर्ष कोंकणातील कातळशिल्प या विषयावर विविधांगी काम करणारे श्री सुधीर (भाई ) रिसबुड, श्री धनंजय मराठे यांच्या शासन, प्रशासन दप्तरी चालू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. या प्रवासात कातळशिल्प रचनांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा मिळवून देणे तसेच यूनेस्को जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळणेसाठी चालू असलेल्या प्रयत्नांनामध्ये डॉ. तेजस गर्गे, संचालक, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
कातळशिल्प संरक्षण संवर्धन कामात ऊक्षी गावाचे योगदान उल्लेखनीय आहे. सन 2017 मध्ये सर्वप्रथम निसर्गयात्री संस्था आणि लोकसहभाग यांच्या एकत्रित प्रत्यनातून कातळशिल्प संरक्षण संवर्धनाचे काम सुरू झाले. याच गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने ऊक्षी कातळशिल्प ठिकाण एक हे संरक्षित केले तसेच तेथे जाणे येणेसाठी मार्ग बनविण्यात आला. या कामात प्रशासना सोबत श्री किरण सामंत यांचे देखील अप्रत्यक्षरीत्या सहकार्य लाभले आहे. लोकसहभागातून संरक्षित करण्यात आलेले हे अखंड भारतातील पहिले प्रागैतिहासिक ठिकाण. यासाठी ऊक्षी गावाचे श्री मिलिंद खानविलकर, श्री हरिश्चंद्र बणबे हे निसर्गयात्री संस्थेच्या सहाय्याने करत असलेले काम विशेष प्रशंसनीय आहे. परिणामस्वरूप गेल्या दोन एक वर्षात 60 हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी या गावातील कातळशिल्प ठिकाणांना भेट दिली आहे. कातळशिल्प पहाण्याच्या निमित्ताने या गावाकडे पर्यटक, अभ्यासक यांचे लक्ष वेधले गेले आहे. आता राज्य शासनाने सकारात्मकपणे लक्ष घातल्याने ऊक्षी गावातील वारसा संरक्षण संवर्धनाला आणि पर्यटन विकासाला निश्चितपणे चालना मिळेल.
(मिलिंद खानविलकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने बोलताना शासनाच्या उपक्रमाला ग्रामस्थांचे संपूर्ण सहकार्य असेल यांचे ग्वाही दिली. त्याचसोबत पुरातत्व विभागाने काम करण्याअगोदर जागा मालकांशी सुयोग्य संवाद साधावा, त्यांना लेखी पत्र द्यावे, त्यांची पूर्वपरवानगी घ्यावी असे सूचित केले. तसेच ग्रामस्थांच्या वतीने ऊक्षी ठिकाण क्रमांक 2 येथे लोकसहभागातून चालू असलेले काम पूर्व परवानगी न घेता काढून टाकल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे पुरातत्व विभाग रत्नागिरी कार्यालयाचे सहकार्य मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाने गेली अनेक वर्ष यावर काम करत असलेल्या व्यक्ति,संस्था, ग्रामस्थ यांचा आदर राखावा, ते करत असलेल्या कामाला हातभार लावावा असे मत व्यक्त केले.












