तर पतीने बेदम मारहाण केल्याची 15 जणांविरुद्ध केली तक्रार
लांजा | प्रतिनिधी : पत्नीला जबरदस्तीने टेम्पोत बसवून तिला हात ठोस्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून फिर्यादी पतीने देखील आपल्याला दहा ते पंधरा जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून एकूण 15 ते 16 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली होती.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा विशाल गुरव (वय 28 राहणार धुंदरे) हिने केलेल्या तक्रारीनुसार पतीबरोबर पटत नसल्याने कौटुंबिक हिसाचार व पोटगीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. आपण दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता औषध येण्यासाठी लांजा येथे येत असताना पती विशाल रामचंद्र गुरव( वय 28 राहणार गोंडेसखल) याने कोर्ले तिठा येथे ट़ेम्पो थांबवला आणि आपल्याला टेम्पो बसण्यास सांगितले .मात्र आपण टेम्पो बसण्यास विरोध केला असता त्यांनी जबरदस्तीने आपल्याला टेम्पो बसवले आणि त्यानंतर आपल्या एका हाताने माझी मान दाबून हाताच्या ठोशाने मारहाण केली. तसेच केस पकडून डोके टेम्पोच्या केबिन वरील डिस्कवर आपटले. पत्नी पूजा गुरव हिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती विशाल गुरव याच्यावर भा.द.वि. कलम 498, (अ), 365 ,323 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तर विशाल रामचंद्र गुरव राहणार गोंडेसखल) लांजा याने केलेल्या तक्रारीनुसार आपण आपली पत्नी पूजा गुरव हिला टेम्पोतून घरी घेऊन जात असताना रितेश गुरव याने आपल्या डोक्यावर हाताच्या ठोशाने मारहाण केली. रितेश यांचा मोठा भाऊ तसेच बाबा धावणे व अन्य 15 जणांनी आपल्याला जमिनीवर खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी रितेश तुकाराम गुरव, बाबा धावणे रितेश याचा मोठा भाऊ व इतर 14 असे एकूण 15 जणांवर भादविकलम 143, 147, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे करत आहेत.











