ऐन गणेशोत्सवात पोलिसांची अवैध दारू धंद्यांवर कारवाई 

कणकवली शिवाजीनगर व कांबळेगल्ली येथे धाड

१ लाख ९२ हजार ८०० रुपयांची दारू जप्त 

कणकवली : गणेशोत्सव सुरू असतानाच जिल्हाभर अवैध धंद्यांवर धाडी टाकण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कणकवली पोलिसांनी कणकवली शहरात गोवा दारूची अनधिकृत विक्री सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये तृप्ती तुळशीदास हुन्नरे ( रा. कणकवली शिवाजीनगर ) ही राहत्या घराच्या पडवीत गोवा बनावटीच्या दारूची विक्री करत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास करण्यात आली. त्याचप्रमाणे वैशाली शशिकांत बोर्डवेकर (५८, रा. कणकवली कांबळी गल्ली) ही कांबळीगल्ली येथीलच एका पडवीत, अडगळीच्या ठिकाणी गोवा बनावटीच्या दारूची विक्री करत होती. त्यानुसार पोलिसांनी तेथेही छापा टाकून १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दुपारी १२.२५ वा. च्या सुमारास करण्यात आली.

 

दोन्ही ठिकाणच्या कारवायांमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, हवालदार पांडुरंग पांढरे, विनोद सुपल, कॉन्स्टेबल उज्ज्वला मांजरेकर आदी सहभागी झाले होते. अधिक तपास सूरु आहे.