हिंजवडीतील फ्लॅटमध्ये एआयच्या मदतीने हायड्रोपोनिक गांजाचे उत्पादन; 3.45 कोटींचे ड्रग नेटवर्क उघड

एमबीए पदवीधरांनी फ्लॅटमध्ये उभारली गुप्त ड्रग फॅक्टरी

डार्क वेब, क्रिप्टोकरन्सी व सोशल मीडियाचा गैरवापर

हिंजवडीतील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये दोन एमबीए पदवीधरांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हायड्रोपोनिक गांजाचे गुप्त उत्पादन सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील पुरवठादारांच्या मदतीने हे नेटवर्क शहरभर पसरले होते. खडकी पोलिसांनी एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या अटकेनंतर या संपूर्ण ड्रग साखळीचा पर्दाफाश केला. तपासात डार्क वेब, क्रिप्टोकरन्सी आणि सोशल मीडियाचा वापर केल्याचे समोर आले आहे. या कारवाईत 3.45 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, उपकरणे व मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.


पुणे : महत्त्वाकांक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापरातून दोन एमबीए पदवीधरांनी हिंजवडीतील भाड्याच्या अपार्टमेंटचे गुप्त हायड्रोपोनिक गांजा उत्पादन केंद्रात रूपांतर केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील दोन संपर्कांनी कच्चा माल पुरवल्याने हे ऑपरेशन नऊ प्रकारच्या सिंथेटिक ड्रग्सचा व्यवहार करणाऱ्या शहरव्यापी नेटवर्कमध्ये विकसित झाले होते.

28 नोव्हेंबर रोजी खडकी पोलिसांनी दिल्लीचा रहिवासी व सध्या सुस येथे राहणारा तुषार चेतन वर्मा (21) या अभियांत्रिकी विद्यार्थ्याला हायड्रोपोनिक गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विक्रमसिंह कदम, निरीक्षक किरण गायकवाड आणि उपनिरीक्षक दिग्विजगिले यांच्या पथकाने केली.

वर्माच्या चौकशीतून पोलिसांचे लक्ष दोन एमबीए पदवीधरांकडे वळले. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितले की, सुमित डेडवाल (25) आणि अक्षय मेहेर (25) हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे असून हिंजवडीत राहत होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांना पूर्ण वातानुकूलित फ्लॅटमध्ये ओजी-कुश तयार करणारा हायड्रोपोनिक सेटअप चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

पुढील तपासात आरोपींनी ड्रग्स तयार व वितरित करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी, डार्क वेब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केल्याचे उघड झाले. वैद्यकीय किंवा फार्मास्युटिकल पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी औद्योगिक जागेऐवजी फ्लॅटमध्ये उत्पादन युनिट डिझाइन करण्यासाठी AIचा वापर केल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

पुणे पोलिसांनी फ्लॅटमधून ओजी-कुश, उपकरणे, रोपटे आणि सुमारे 45 लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले असून झाडे नष्ट करण्यात आली आहेत. भाडेकरार अक्षय मेहेर यांच्या नावावर होता.

चौकशीत आरोपींनी मुंबईतील दोन पुरवठादारांची नावे उघड केली. घाटकोपर (पश्चिम) येथील मलय राजेश डेलीवाला (28) आणि कुर्ला येथील स्वराज भोसले (28) यांना अटक करण्यात आली. डेलीवाला यांना आसामहून परतताना मुंबई विमानतळाजवळ ताब्यात घेण्यात आले.

डेलीवालाच्या मुंबईतील घरावर टाकलेल्या छाप्यात हायड्रोपोनिक गांजा, साधा गांजा, चरस, CBD तेल आणि 2.8 कोटी रुपये किमतीचे प्रतिबंधित पदार्थ सापडले. प्राथमिक तपासात थायलंडमधील पुरवठादारांकडून कच्चा माल मागवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

सोशल मीडियावर टोपणनावे वापरून संपर्क ठेवत आरोपी डार्क वेबवर वेगळी ओळख राखत होते. सुरुवातीला त्यांनी बनावट पत्ते दिले, मात्र ई-कॉमर्स वितरण रेकॉर्ड ट्रेस करून पोलिसांनी उत्पादन युनिटचा शोध लावला.

एकूण 3.45 कोटी रुपयांचे ड्रग्स, उपकरणे व मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या असून 25 बँक खाती आणि क्रिप्टो वॉलेट्स गोठवण्यात आली आहेत, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.