रत्नागिरी शहरातील १५७ कोटींच्या विकासकामांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 17 डिसेंबरला शुभारंभ

रत्नागिरी | प्रतिनिधी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी शहरातील प्रस्तावित 157 कोटीहून अधिक रकमेच्या कामांचा शुभारंभ 17 डिसेंबर रोजी होणार आहे.

मंत्रिपद स्वीकारल्यापासून ना. सामंत यांनी रत्नागिरी शहरासाठीही तब्बल 157 कोटी रुपये खर्च करुन विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. याचा शुभारंभ 17 डिसेंबर रोजी होणार आहे. यात प्रामुख्याने शहरातील प्रमुख रस्तांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. 96 कोटी रुपये देण्यात आले असून, कामाचा कार्यादेश देण्यात आलेला आहे.

स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या दुरुस्ती कामालाही सुरुवात झाली आहे. यासाठी सुमारे 7 कोटी निधी देण्यात आला आहे. रत्नागिरी शहराच्या खालील भागात स्विमींग पूल उभारण्यासाठी 8 कोटी, नवीन भाजीमार्केट विकसित करण्यासाठी 2 कोटी, नाट्यगृहामागील खाऊ गल्ली विकसित करण्यासाठी 50 लाख, जिजामाता गार्डन जवळील खाऊगल्लीसाठी 50 लाख, विश्वनगर येथे गार्डन तयार करण्यासाठी 1 कोटीचा निधी देण्यात आला आहे. रत्नदुर्ग किल्ला येथे शिवसृष्टी उभारण्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. तेलीआळीमध्ये गार्डन विकसित करण्यासाठी 1 कोटी, छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी तर थ्रीडी मॅपिंग मल्टीमिडिया शोसाठी 20 कोटी देण्यात आले असून याचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.

शहरातील जुने भाजीमार्केट नूतन इमारत बांधणेसाठी 3 कोटी, मारुती मंदिर भाजीमार्केटमधील पहिल्या मजल्याच्या कामाचे बांधकाम 2 कोटी, भारतरत्नने सन्मानित कोकण विभागातील मान्यवरांच्या प्रतिकृतीचे सुशोभिकरण 3 कोटी आदी कामे निविदा स्तरावर आहेत. जिजामाता उद्यान सुशोभिकरण 1.55 कोटी, ध्यान केंद्रांचे बांधकाम 5 कोटी आदी कामांचे कार्यादेश देण्यात आलेला आहे. शिर्के उद्यान सुशोभिकरण 1.25 कोटी, विठ्ठल मूर्ती उभारण्यासाठी गार्डनमध्ये चबुतरा उभारणे व अन्य कामांसाठी निधी देण्यात आला आहे.

या सर्व विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 17 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.