रत्नागिरी l प्रतिनिधी :रत्नागिरीमधील जेष्ठ बॅडमिंटन खेळाडू आणि बॅडमिंटन प्रशिक्षक आणि कलाप्रेमी नागरिक मदन चव्हाण यांचे दु:खद निधन झाले.
रत्नागिरीमधील बॅडमिंटन खेळाला आजचे भव्य स्वरूप देण्यासाठी आणि या खेळाला सातत्त्याने प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करणारे बॅडमिंटनचे आद्य प्रशिक्षकांपैकी एक मदन चव्हाण यांचे दिनांक 9.12.2023 रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 82 वर्षे होते.
रत्नागिरीमध्ये केंद्र शासनाच्या पोस्ट खात्यामध्ये नोकरी करीत असतांनाच त्यांच्यामधील खेळाडू वृत्तीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी लहान वयातील नवोदित खेळाडूना बॅडमिंटनचे प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आणि अक्षरश: बॅडमिंटन खेळ जगविला आणि परिणामी हा खेळ रत्नागिरीमध्ये आज चांगल्या खेळाडूंची निर्मिती करणारा खेळ म्हणून नावारूपास आला आहे. स्वत: बॅडमिंटनपटू असलेले मदन चव्हाण यांनी पोस्ट खात्याच्या अनेक राज्य आणि अखिल भारतीय पातळीवरील बॅडमिंटन स्पर्धामध्ये अनेकदा विजेतपद मिळविले होते. अगदी काही वर्षापूर्वीच आजारपणामुळे त्यांनी प्रशिक्षणाचे वर्ग थांबविले होते. त्यांच्या प्रशिक्षणामुळे रत्नागिरीमध्ये अनेक खेळाडूंनी प्राथमिक धडे घेऊन स्पर्धात्मक खेळांमध्ये पुढे चांगले यश मिळविले आहे.
मदन चव्हाण हे सामाजिक क्षेत्रामध्येही बहुआयामी व्यक्ति म्हणून प्रसिध्द होते. पोस्ट खात्यामध्येही अधिकारी म्हणूनही त्यांचे सर्वच कर्मचारी वर्गाशी अगदी जिव्हाळ्याचे संबध होते. रत्नागिरीमधील खालची आळी मार्गशीर्ष गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जवळपास 12 वर्षे काम पाहिले होते. मंगलमूर्ती स्पर्धेमध्येही परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. रत्नागिरीमधील सर्वच क्षेत्रामध्ये त्यांची मित्रमंडळी आहेत. एक बहुआयामी संयमी आणि प्रसिध्दीपरांगमुख व्यक्तिमत्व लाभलेले मदन चव्हाण यांच्या दु:खद निधनाने क्रिडा आणि कलाप्रेमी मित्रमंडळींनी त्यांचेकडे प्रशिक्षण घेतलेल्या बॅडमिंटन खेळाडूंनी आणि अनेक नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. मदन चव्हाण यांचे पश्चात त्यांचे बंधू, पत्नी, मुली-जावई-नातवंडे असा मोठा परिवार आहे.











