संतोष वायंगणकर
गणपतीपुळे समुद्रात तरूण बुडाले, तारकर्ली समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने तरूण बुडाले एकाचा जीव वाचविण्यात यश, या अशा बातम्या नेहमीच येतात. जीव वाचला अशी न्यूज डेस्कवर आली तर हायसे वाटते. पण कॉलेज तरूण-तरूणींच्या मृत्युची बातमी समोर येते तेव्हा पायाखालची वाळू सरकते. बसल्याजागी स्तब्ध व्हायला होतं. कोणाची चूक कुणाचं बरोबर हे ठरवलं तरीही या सर्वच प्रश्नांची उत्तर अनुत्तरीत राहतात. तारकर्ली, गणपतीपुळे समुद्रात तर पुणे, मुंबई आदी भागातून पर्यटनासाठी येणारे तरूण-तरूणी सहज समुद्राच्या पाण्यात उतरतात. पाण्याचा अंदाजही त्यांना नसतो आणि मग मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांच्या डोळयादेखत समुद्रात उंचावणारे तरूणाचे हात तळाशी जातात आणि मग मृतदेहच थेट नातेवाईकांच्या भेटीला येतो. हे असच घडतंय होत रहात.
समुद्र किनाऱ्यावर सूचना फलक लावलेले असतात. ‘समुद्राचं पाणी खोल आहे. कोणीही पर्यटकाने समुद्राच्या पाण्यात उतरू नये.’ परंतु हे फलक पहातोय कोण? पाहिले तरी हे असले फलक सगळीकडेच लावलेले असतात. असं म्हणून बऱ्याचवेळा येणाऱ्या पर्यटक त्या फलकांकडे दुर्लक्षच करतात. शनिवारी देवगडला घडलेली घटनाही दुर्दैवीच म्हणावी लागेल. पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीचे विद्यार्थी सहलीसाठी कोकणात आलेले होते. बिचवर फिरण्याचा मोह कुणालाही होतो. त्यात मालवण, देवगड बिचवर फिरल्यावर समुद्रात उतरण्यापासून या संकल्प सैनिक स्कुलमधील विद्यार्थी स्वत:ला आवरू शकले नाहीत. यातच पायल राजू बनसोडे, अनिशा नितीन पवळ, प्रेरणा रमेश डोंगरे, अंकिता
राहुल गलाटे या तरूणींचा बुडून मृत्यू झाला आहे. आकाश बाळासाहेब तुपे हा विद्यार्थी यातून वाचला आहे. तर रामचंद्र घन:श्याम डिचोलकर याचा मृतदेह सापडला आहे. सैनिक स्कूलचे हे विद्यार्थी-विद्यार्थीनी सहलीसाठी आले आणि घडले भलतेच. या अशा घटना घडल्यावरही जर त्यातून कोकणात पर्यटनासाठी येणारे शाळा-कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यांना घेऊन येणारे शिक्षक जर यातून काही शिकणार नसतील तर सारंच अवघड होऊन जातं. प्रशासनाने यातून आणखी सतर्कता दाखवली पाहिजे. परंतु ज्याची काळजी त्यानेच घेतली पाहिजे. काळजी दुसरा कोण किती घेणार? लावलेले फलक नजरेआड केले जात असतील तर अशा दुर्दैवी घटना घडतच राहणार. पर्यटनासाठी विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांनी अधिक काळजीपूर्वक यात लक्ष घातले पाहिजे. यानिमित्ताने मला वीस वर्षापूर्वीची देवगड कुणकेश्वरमधील एक घटना आठवली.
मी तेव्हा दैनिक तरूण भारतचा देवगड प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. असाच सहज म्हणून कुणकेश्वर मंदिर परीसरात होते. समुद्रकिनाऱ्यावर उभा असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याशा माध्यमिक विद्यालयाची सहल आलेली. विद्यार्थी – शिक्षक किनाऱ्यावर होते. ‘‘अबब…केवढा हा समुद्र… रंकाळयापेक्षा लय मोठा हाय’’ हा त्यातील विद्यार्थ्यांचा कानी पडलेला संवाद आजही मन अस्वस्थ करतो. पुणे, पश्चिम महाराष्ट्र मुलांनी समुद्र पाहिलेला नसतो. एखाद्या तलावात किंवा स्विमिंग टँकमध्ये पोहणाऱ्या मुलांना समुद्रात पोहता येणं शक्य नसत. त्यामुळेच मग अशा दुर्दैवी घटना घडतात. घडलेल्या घटनेतून आपण काही शिकलं पाहिजे.
संपूर्ण किनाऱ्यांवर अधिक सूचना फलक लावले पाहिजेत. पुन्हा कोकणात अशा घटना घडू नयेत. याची खबरदारी आपणच घ्यायला हवी. कोल्हापूरचा
रंकाळा पाहिलेल्या मुलांना समुद्राच्या उधाणाच्या लाटा मोहात पाडतात. समुद्र या मुलांना खुणावतो आणि मग त्यातून मृत्युचे तांडव उभे राहते.












