साडेदहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
चिपळूण (प्रतिनिधी) : घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे साडेदहा लाख रूपयांच्या सोने, चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या दोन घटना शहरालगतच्या कापसाळ दुकानखोरी येथे घडल्या. यातील एक चोरी सप्टेंबर महिन्यात तर दुसरी १२ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदम्यान घडल्याची नोंद चिपळूण पोलीस स्थानकात झाली आहे. फिर्यादींच्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरटयाने मागील दरवाजाने घरामध्ये प्रवेश करून बेडरूमधील कपाटातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ५ लाख ३६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दुसरी तक्रार फिर्यादी अमोल अंकुश साळवी (३५) यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० ते दि. ४ डिसेंबर रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास अमोल साळवी यांच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरातील मागील दरवाजाने आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने बेडरूममधील (लॉकरमध्ये ठेवलेले ५ लाख १८ हजार १०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व ६ हजार रूपये किंमतीचे चांदीचे दागिने असे मिळून ५ लाख २४ हजार १०० रूपयांचे दागिने चोरून नेले.










