रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळतर्फे अध्यात्म मंदिर, वरची आळी, रत्नागिरी येथे गुरुवार दि. 15 डिसेंबर 2023 रोजी स्वामी स्वरूपानंदांच्या तारखेप्रमाणे जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. 15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दु. 2.30 वा. गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय उच्च व कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होईल. दुपारी 3 वा. सौ. सुनंदाताई शाळीग्राम, पुणे यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ होईल. सायं. 7 वा. श्री क्षेत्र पावस षण्मासिकाचे प्रकाशन होईल. यावेळी सौ. सुनंदाताई शाळीग्राम, पुणे यांचे प्रवचन होईल.
सौ. सुनंदा आनंद शाळीग्राम यांचा जन्म 23 जून 1953 रोजी झाला. त्या मराठीमध्ये एमए झाल्या आहेत. स्वामी स्वरूपानंदांचे अधिकारी शिष्य श्रीमत् स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्याकडून त्यांनी 1977 साली गीताजयंतीला अनुग्रह घेतला असून सोऽहं साधना प्राप्त केली आहे. 1991 पासून त्या विनामूल्य प्रवचन करीत आहेत. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, हरिपाठ, तुकारामांचे अभंग, अमृतानुभव, आत्माराम, विवेकचुडामणि, योगवसिष्ठ, नारदभक्तिसूत्रे, श्रीमद् भागवत पुराण, दहाही उपनिषदे आदी विषयांवर त्यांची प्रवचने झाली आहेत.
ज्ञानदेवांच्या हरिपाठावरील चिंतन करणारा ‘हरिपाठचिंतन, नारदभक्तिसूत्रावर विवरण करणारे ‘भक्तीच्या खुणा’, तुकारामांच्या अभंगाचा गुढार्थ सांगणारा ‘अभंगाच्या गाभाऱ्यात’ सत्संगाचा खरा अर्थ व महिमा सांगणारे ‘संतासवे वसता’, ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा रसास्वाद घेणारे ‘अनुभवातून स्वाद’ आदी ग्रंथांचे लेखन केले आहे. गुरूसेवेच्या भावनेतून त्यांनी ‘विरामचिन्हांकित ज्ञानेश्वरी’, श्रीसत्यदेवभाव सुमनमाला हा काव्यसंग्रह, ‘स्वामी म्हणे’ हा पत्रसंग्रह, ‘सत्यविचारधारा’ हा लेखसंग्रह आदींचे प्रकाशन केले आहे. गीताधर्ममंडळ, पुणे यांचेतर्फे ‘व्यासगौरव’, हरिकीर्तनोत्तेजक सभा, पुणेतर्फे ‘उत्तम स्त्री प्रवचनकार’, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था पुणेतर्फे ‘काशी केशव दासबोध पुरस्कार’, एकनाथांच्या वाड्मयाचा प्रसार केल्याबद्दल श्री पुरोहित, पुणे यांचेतर्फे ‘नाथदास पुरस्कार’ तसेच पुणे विद्यापीठातर्फे ‘अमृतानुभव’ यावरील व्याख्यानाबद्दल उत्कृष्ठ व्याख्याता’, ‘स्वामी स्वरूपानंद स्मृती पुरस्कार’ आदी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.











