कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

कापसाळ येथील दुर्दैवी घटना; एकजण गंभीर जखमी

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहासमोर कार व दुचाकी यांच्यात जोरदार अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या प्रौढाचा सोमवारी उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी कार चालकावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निशांत शनेशकुमार लकडे (२२, कापसाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे. तर या अपघातात श्रीपत महादेव तांबडे (४८, कापसाळ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुचाकीस्वार शशिकांत शांताराम महाडिक (कापसाळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. शशिकांत महाडिक हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीच्या मागे श्रीपत तांबडे यांना बसवून ते कापसाळच्या दिशेने जात होते. यावेळी या मार्गावरून निशांत लकडे हा देखिल कार घेऊन कापसाळच्या दिशेने जात होता. हे दुकीस्वार शासकीय विश्रामगृह येथे असलेल्या पेट्रोल पंपासमोरुन जात असताना निशांत लकडे याने त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की या अपघातात दुचाकीस्वार शशिकांत महाडिक व दुचाकीच्या मागे बसलेले श्रीपत तांबडे हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच कापसाळ गावचे सरपंच सुनिल गोरिवले, सचिन गायकर, बंड्या भुवड, वैभव भुवड यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले. त्यांनी श्रीपत तांबे व शशिकांत महाडिक यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथून त्यांना डेरवण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. येथे उपचार सुरु असतानाच सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास श्रीपत तांबडे यांचे निधन झाले. तसेच जखमी शशिकांत महाडिक यांनाही उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. या. अपघाताप्रकरणी कार चालक निशांत लकडे याच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.