चिपळूण न.प.कडून १५ डिसेंबरची सुनावणी रद्द
चिपळूण (प्रतिनिधी) : जनमताचा आदर करून पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शहरातील वाढीव घरपट्टीच्या प्रक्रीयेलाच स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे मालमत्ता धारकांच्या हरकतीबाबत नगर पालिकेने १५ डिसेंबर रोजी आयोजित केलेली सुनावणी रद्द केली आहे. ही सुनावणी २५ डिसेंबर नंतर होण्याची शक्यता आहे. तर नोटिसा बजावल्यापासून आतापर्यंत २५० हून अधिक मालमत्ता धारकांनी हरकती दाखल केल्या आहेत.
शहरात सुधारीत मालमत्ता कर आकारणीसाठी एजन्सीमार्फत सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित मालमत्ता धारकांना नगर पालिकेने नोटीसा बजावून हरकती दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे शहरातील मालमत्ता धारकांनी अडीचशेहून हरकती दाखल केल्या आहेत. मात्र, शहरातील काही नागरिकांचा या सुधारीत कर आकारणीला आक्षेप आहे. याविषयी ओरड झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी नगर पालिकेवर धडक देत प्रशासनाला त्याचा जाब विचारला. तसेच ही प्रक्रीया तत्काळ थांबवून फेर सर्वेक्षणची मागणी केली आहे. सर्वपक्षीय मागणी झाल्याने पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी देखिल याविषयीची दखल घेत या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे नगर पालिकेनेही तातडीने ही प्रक्रिया थांबवली आहे. हरकतदार मालमत्ता धारकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी नगर पालिकेत सुनावणी आयोजित केली होती. त्याबाबतच्या नोटिसादेखिल बजावण्यात आल्या आहेत. मात्र आता पालकमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने ही सुनावणी रद्द करीत ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर सदरची सुनावणी ही २५ डिसेंबर नंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चौकट-
नोटीस रद्द झाल्याबाबतचा खुलासा व्हावा
माजी नगरसेवक संजय तांबडे यांची मागणी
कोरोनाची महामारी, शहरातील महापूर, मुंबई-गोवा महामार्गाचे काम, या तीन महासंकटाने चिपळूण शहर अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहे. येथील व्यापारी आणि नागरिक आर्थिक संकटात सापडलेले असताना नगर पालिका हद्दीमध्ये नवीन चर्तुथ आकारणीचा सर्व्हे करुन नागरिकांना नोटीसा धाडण्यात आल्या. मात्र या सर्व्हेला आणि अवाजवी नवीन घरपट्टी आकारणीला सर्वच राजकीय पक्षांकडून, सर्व नागरिकांकडून तीव्र विरोध झाल्याने पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी चिपळूणच्या जनभावनेचा आदर करुन कर आकारणीला स्थगिती दिली आहे. नगर पालिकेने वर्तमानपत्रात हरकती बाबत प्रसिध्द केलेली नोटीस रद्द झाल्याबाबत खुलासा नोटीसीद्वारे करण्यात यावा. चिपळूणकरांच्या मनामध्ये पसरलेला संभ्रम दूर करावा. जुन्या पध्दतीने घरपट्टी स्विकारणार आहात, याची माहितीही जनतेस द्यावी, अशी मागणी माजी बांधकाम सभापती संजय तांबडे यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे केली आहे.










