डायडाज डान्स स्टुडिओ आयोजित ‘डान्स विथ आई’ व ‘डान्स विथ स्टुडंट्स’ नृत्यस्पर्धा जल्लोषात संपन्न

पालक-विद्यार्थी नात्याचा भावनिक आविष्कार आणि नृत्यकलेचा दर्जेदार संगम

चिपळूण :
डायडाज डान्स स्टुडिओ, चिपळूण यांच्या वतीने आयोजित ‘डान्स विथ आई’ आणि ‘डान्स विथ स्टुडंट्स’ या अनोख्या व संकल्पनात्मक नृत्यस्पर्धेचे आयोजन दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या स्पर्धेमुळे चिपळूण शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नृत्यप्रेमींसाठी एक सांस्कृतिक पर्वणी ठरली.

या भव्य दिव्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे आई-मुलांच्या भावनिक नात्याला नृत्याच्या माध्यमातून व्यक्त करणारी ‘डान्स विथ आई’ ही संकल्पना उपस्थित प्रेक्षकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण नगर परिषदेचे नवचर्चित नगरसेवक श्री. कपिल शिर्के, श्री. निहार कोवळे, सौ. रसिका ताई देवळेकर, तसेच ज्येष्ठ माजी नगरसेविका सौ. सीमाताई चाळके उपस्थित होत्या. याशिवाय चिपळूण आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते श्री. राजूभाई जाधव, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक श्री. नंददीप देवळेकर, उद्योजक श्री. हेमंत जाधव, तसेच डायडाज डान्स स्टुडिओचे संचालक व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त नृत्यदिग्दर्शक श्री. सुरज विलास जाधव आणि रत्नागिरी येथील किरण डान्स अकॅडमीचे प्रमुख श्री. किरण बोरसुतकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने नटराज पूजनाने करण्यात आली. त्यानंतर डायडाज डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उद्घाटन नृत्यप्रस्तुतीने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, भावपूर्ण व तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट नृत्यप्रस्तुतींनी डायडाज स्टुडिओची गुणवत्ता अधोरेखित केली.

स्पर्धेदरम्यान ‘डान्स विथ आई’ आणि ‘डान्स विथ स्टुडंट्स’ या दोन्ही प्रकारांत स्पर्धकांनी शास्त्रीय, फ्रीस्टाइल, बॉलीवूड, सेमी-क्लासिकल अशा विविध नृत्यशैलींमधून आपली कला सादर केली. प्रत्येक सादरीकरणामध्ये भाव, ताल, अभिनय व समन्वय यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डान्स प्लस – सीझन 6 चे विजेते श्री. तेजस धुमन खेडे सर उपस्थित होते. त्यांनी स्पर्धकांचे सादरीकरण अत्यंत बारकाईने पाहून तांत्रिक कौशल्य, अभिव्यक्ती व सादरीकरणाच्या आधारे निकाल जाहीर केला.

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे –

डान्स विथ आई :
▪ प्रथम पारितोषिक – सौ. आरती गार्डी व अभिराज गार्डी
▪ द्वितीय पारितोषिक – मयुरी काटकर व जिजा काटकर
▪ तृतीय पारितोषिक – सौ. धनश्री मंजल व मिहित मंजल

डान्स विथ स्टुडंट्स :
▪ प्रथम पारितोषिक – स्वरांजली निमकर व अधिरा लाड
▪ तृतीय पारितोषिक (विभागून) – साद शेख व सिया शिर्के तसेच महेश पवार व मुक्ता

विजेत्या व सहभागी सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन कु. मैथिली निमकरे यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी शैलीत केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी आपल्या भाषणातून डायडाज डान्स स्टुडिओच्या कार्याचे कौतुक करत, नृत्यकलेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शिस्त व संस्कार वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच अशा उपक्रमांमुळे पालक व मुलांमधील नाते अधिक घट्ट होत असल्याचेही सांगण्यात आले.

डायडाज डान्स स्टुडिओच्या या यशस्वी आयोजनामुळे चिपळूण शहरातील सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थित प्रेक्षकांनी व्यक्त केली.