सावर्डे विद्यालयात व्याख्यान
चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मधुमेह आणि लठ्ठपणा या विषयावर उदबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते सावर्डे मधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण पाटील उपस्थित होते. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी डॉक्टर अरुण पाटील यांचे स्वागत केले. लहान मुलांमध्ये डायबेटिसचे वाढते प्रमाण बघता विद्यार्थ्यांमध्ये मधुमेह विषयी जागृती करणे खूप गरजेचे आहे असे अरुण पाटील यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगताना मधुमेहाचे पाच प्रकार व सध्या वाढत असलेला (MOD) या विषयावर मार्गदर्शन त्यांनी केले.
किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत असून ती एक चिंतेची बाब आहे. लहान वयात मधुमेह होण्याची कारणे म्हणजे बदलती जीवनशैली आणि फास्टफूडवर असलेला भर हे आहेत लहान वयात वाढत असलेला लठ्ठपणा म्हणजेच अकार्यक्षमता याविषयी माहिती देताना मधुमेहाचे शरीरावर होणारे परिणाम सांगितले. विद्यार्थ्यांनी या वयापासूनच आपले आरोग्य चांगले राखले पाहिजे यासाठी आहारात स्थानिक भाज्या, फळे व धान्य यांचा समावेश करावा. दररोज व्यायाम करावा तसेच शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी मैदानी खेळ खेळा,सायकल चालवा, शेतीची कामे करा, बागकाम करा, मोबाईलचा वापर कमी करा आणि आपलं आरोग्य चांगलं राखा. आरोग्यासाठी मेहनतीची सवय असणे चांगले असे ते म्हणाले. विद्यार्थी म्हणजे उद्याचा नागरिक त्याने मधुमेह निर्मूलनासाठी दूत म्हणून कार्य करावे, असे आवाहन व्याख्याते अरुण पाटील यांनी केले. प्रास्ताविक जयंत काकडे यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन सुखदेव म्हस्के यांचे होते. कार्यक्रमाला प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक उद्धव तोडकर, जगन्नाथ गावडे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.











