गुहागर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांनी शृंगारतळी येथे असणाऱ्या एचडीएफसी बँकेला दि. ११ डिसेंबर रोजी भेट दिली. या भेटीवेळी या बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.
श्री. चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सर्वप्रथम त्यांनी एचडीएफसी बँकेविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच बँकेमध्ये जे काही विविध व्यवहार होतात त्याची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने ठेवी, कर्जे आणि त्यांचे प्रकार त्यावरील व्याजदर याची माहिती देऊन पूर्वीच्या बँक व्यवहारांमध्ये आणि आत्ताच्या बँक व्यवहारांमध्ये नेमका काय फरक आहे याची माहिती त्यांनी दिली. सर्वसामान्य व्यक्तीकडून आणि व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात बँकेचा वापर होतो आणि त्यामध्ये डीजिटल घटकाचा वापर कशा प्रकारे वाढला आहे याची सविस्तर माहिती त्यानी दिली. डिजिटल घटकाचा वापर करताना कशा प्रकारे काळजी घ्यावी हे त्यानी विविध उदाहरण देऊन सांगितले.
धनादेशाचे प्रकार त्याचे तसेच त्याचे असणारे स्वरूप आणि सिबिल स्कोर याची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. अलीकडच्या काळामध्ये होत असलेले बँकेच्या अनुषंगाने सायबर गुन्हे, ऑनलाईन फॉर्म, केवायसी याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. बँकेमध्ये करिअर कशा पद्धतीने करता येईल आणि बँक मुलाखतीला कशाप्रकारे सामोरे जावयाचे याची माहिती त्यांनी दिली. अलीकडच्या काळामध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होतो त्यामध्ये नेमका काय फरक आहे त्याचा वापर कसा करावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याची त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. आपले मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडून पैसे काढण्याच्या आणि पैसे भरण्याच्या स्लिप आणि धनादेश याची माहिती देऊन प्रत्येक विद्यार्थ्याकडून ते भरून घेतले आणि त्यामधील चुका विद्यार्थ्यांना सांगितल्या. सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत बँकेच्या प्रत्येक घटकाची सविस्तर माहिती त्यांनी दिली. भेटीवेळी महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष खोत आणि द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.












