आंबोली सावंतवाडी रस्त्याचे काम सुरू असताना दुर्लक्ष केल्याचा आरोप
संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचीही मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी – आंबोली रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना संबंधित अभियंत्याचा दुर्लक्ष झाल्यानेच या रस्त्यावर खड्डे पडून अपघात झालेत आहेत. या खड्डयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी व लोकांच्या अपघात व मृत्यूस कारणीभूत ठरल्याने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी बुधवारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेत याबाबतचं निवेदन सादर केलं.
सविजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व अभियंतांच्या दुर्लक्षामुळे हे रस्ते निष्कृष्ट दर्जाचे होत आहेत. रस्त्यातील भ्रष्टाचारात अधिकारी व ठेकेदार यांच्यात संगनमत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी बबन साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवकांनी केली.
आंबोली घाट-सावंतवाडी रस्त्याचं काम सुरू होत त्यावेळी अभियंतांनी लक्ष देण्याची गरज होती. परंतु इथं दुर्लक्ष केल्यामुळे हे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे.
तसेच आंबोली घाटातून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते त्यामुळे रस्त्याचं काम सुरू असताना लक्ष देण्याची गरज होती. परंतु तसं न झाल्याने आज नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. दरवर्षी हा रस्ता खराब होतो. यामुळे अपघातांच प्रमाण वाढून लोकांचे नाहक बळी जात आहेत. वढंच नाही तर ज्या मार्गाने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण प्रवास करतात त्याच रस्त्यावर भ्रष्टाचार करण्याची हिंमत हे अधिकारी करत आहेत. त्यामुळे तात्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी बबन साळगावकर यांनी केली.
तर गुन्हे दाखल न झाल्यास आपण जिल्हा न्यायालयात धाव घेऊ असा इशारा देखील श्री. साळगावकर यांनी यावेळी दिला.
दरम्यान, याबाबत आपण बांधकाम विभागाला लेखी स्वरुपात पत्र देऊन जबाब घेऊ तर तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी माजी नगराध्यक्षांना दिले. दरम्यान , साळगावकर यांनी येथील शहरात काही दिवसापूर्वी घडलेल्या खुनप्रकरणात जलद गतीने तपास करून आरोपीला गजाआड केल्याबद्दल श्री. अधिकारी यांचा सत्कार केला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक सुरेश भोगटे,माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, सिताराम गावडे, बंटी माठेकर ,रवी जाधव, सुधीर पराडकर, अभय पंडित, प्रदीप ढोरे, आसिफ बिजली, मनोज घाटकर, तौकीर शेख, संदीप नाईक आदी उपस्थित होते.








