मंडणगड | प्रतिनिध : विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, आंबडवे येथे ग्रंथालय विभाग व आय. टी विभागाच्या वतीने महाविद्यालयामध्ये फ्रीलान्सर व आय.टी. क्षेत्रातील करिअर च्या संधी याविषयावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आय. सी. कॉलेज खेड येथील सहा. प्रा. शैलेश सुतार यांनी आय. टी. क्षेत्रातील फ्रीलान्सर व करिअर च्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सहा. प्रा. अरुण ढंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पाहुण्याची ओळख करून दिली. यावेळी ग्रंथपाल दिगंबर हेमके यांच्या हस्ते सहा. प्रा. शैलेश सुतार यांना पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
बूक बँक योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या फ्रीलान्सर व करिअर च्या संधी यावर सहा. प्रा. शैलेश सुतार बोलताना म्हणाले की, फ्रीलान्सिंग मध्ये तुमच्याकडे सोशल मीडिया मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट राईटिंग, वेबसाईट डिझाईन, इत्यादी स्किल्स असणे आवश्यक आहे. असे नमूद करून यासंदर्भात लागणार्या सर्व गोष्टीची परिपूर्ण माहिती दिली.
यावेळी सहा. प्रा. अरुण ढंग यांनी सूत्रसंचालन केले तर ग्रंथपाल दिगंबर हेमके यांनी आभार व्यक्त केले. यावेळी उपस्थित सहा. प्रा. अमोल राजेशिर्के व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.











